गुवाहाटी : आपापल्या सलामीच्या लढतीत हार पत्करणारे राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे संघ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आज, बुधवारी आमनेसामने येणार आहेत. या वेळी दोन्ही संघांचा विजयी पुनरागमनाचा प्रयत्न असेल.

गतविजेत्या कोलकाता संघाला ‘आयपीएल’च्या १८व्या हंगामातील सलामीच्या लढतीत घरच्या मैदानावर खेळण्याची संधी लाभली. मात्र, याचा त्यांना फायदा घेता आला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने कोलकाताला सहज पराभूत केले. दुसरीकडे, रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाच्या गोलंदाजांचा सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी समाचार घेतला. त्यामुळे संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी दिलेल्या झुंजीनंतरही राजस्थानला हैदराबादकडून ४४ धावांनी पराभव पत्करावा लागला.

कोलकाताचे घरचे मैदान असलेल्या इडन गार्डन्सवर गोलंदाजांना साथ मिळते. योग्य टप्प्यावर गोलंदाजी केल्यास फलंदाजांना रोखणे शक्य असते. बंगळूरुच्या फिरकीपटूंनी हे करूनही दाखवले. मात्र, कोलकाताच्या अनुभवी गोलंदाजांनी निराशा केली. दक्षिण आफ्रिकन वेगवान गोलंदाज आनरिख नॉर्किएची तंदुरुस्तीही निर्णायक ठरू शकेल. पाठीच्या दुखापतीतून सावरत असलेल्या नॉर्किएला पहिल्या सामन्याला मुकावे लागले होते. फलंदाजीत कर्णधार अजिंक्य रहाणेची कामगिरी ही कोलकातासाठी सकारात्मक बाब ठरली. रहाणेने ३१ चेंडूंत ५६ धावा फटकावल्या. त्याला सुनील नरेनची (२६ चेंडूंत ४४) साथ लाभली. मात्र, रहाणे बाद झाल्यावर कोलकाताची फलंदाजी ढेपाळली. त्यामुळे अन्य फलंदाजांनी कामगिरी उंचावणे आणि अधिक योगदान देणे गरजेचे आहे.

दुसरीकडे, राजस्थानचा संघ हंगामातील पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील असेल. रियान परागला कर्णधार म्हणून अधिक चांगले निर्णय घ्यावे लागतील.

● वेळ : सायं. ७.३० वा. ● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओहॉटस्टार अॅप.