* राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर ८७ धावांनी विजय                           * मुंबईकर अजिंक्य रहाणे विजयाचा शिल्पकार

नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारायची.. धावांचा डोंगर उभारायचा. आणि या डोंगराएवढय़ा लक्ष्याचे आव्हान दाखवत प्रतिस्पर्धी संघाला जेरीस आणायचे.. क्रिकेटमधली ही त्रिसुत्री राजस्थानचा रॉयल्सचा कर्णधार राहुल द्रविडने अमलात आणली आणि ८७ धावांच्या दणदणीत विजयाने त्याचे सकारात्मक फळही त्याला मिळाले. राजस्थानने मुंबईकर अजिंक्य रहाणेच्यानाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर १७९ धावा केल्या. सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग, रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड या मातब्बरांना झटपट माघारी धाडत राजस्थानने दणक्यात सुरुवात केली. या धक्क्यातून मुंबईचे शेर सावरलेच नाहीत आणि त्यांचा ९२ धावांतच खुर्दा उडाला.

  १८० धावांचे खडतर लक्ष्य मिळालेल्या मुंबईला पहिल्याच षटकांत जबर धक्का बसला. फिरकीपटू अजित चंडिलाला स्वीप करण्याचा सचिनचा  प्रयत्न फसला आणि चेंडू सिद्धार्थ त्रिवेदीच्या हाती विसावला. अवघी एक धाव काढून सचिन परतल्याने हे लक्ष्य गाठणे कठीण जाणार हे स्पष्ट झाले. रिकी पॉन्टिंग (४) या सामन्यातही आपल्या अनुभवाची शिदोरी मुंबई इंडियन्ससाठी उघडू शकला नाही. चंडिलानेच त्याला बाद केले. खेळपट्टीवर स्थिरावण्याच्या आधीच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न रोहित शर्माच्या (२) अंगलट आला. घणाघाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध पोलार्डला (१) स्टुअर्ट बिन्नीने त्रिफळाचीत केले. पोलार्ड बाद होताक्षणीच परिस्थिती ४ बाद ३१ झाल्याने मुंबईच्या विजयाच्या आशा मावळल्या. स्पर्धेत सातत्याने खेळ करणाऱ्या दिनेश कार्तिकने ३० धावा करत एकाकी झुंज दिली. मात्र राजस्थानच्या गोलंदाजीनी सातत्याने बळी टिपत मुंबईचे आव्हान संपुष्टात आणले. राजस्थानतर्फे जेम्स फॉल्कनरने सर्वाधिक ३ तर अजित चंडिला आणि स्टुअर्ट बिन्नीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सने योजनांनुसार खेळ करत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची कत्तल केली. स्पर्धेत आतापर्यंत धावांसाठी झगडणाऱ्या शेन वॉटसनने ५ चौकार आणि एका षटकारासह ३१ धावा चोपून काढल्या. वॉटसन-रहाणे जोडीने सात षटकांतच ६२ धावांची वेगवान सलामी दिली. कीरॉन पोलार्डने वॉटसनला बाद करत ही जोडी फोडली. मात्र यानंतर दिशांत याग्निकने २४ चेंडूत ३४ धावा करत आक्रमक खेळी केली. याग्निक-रहाणे जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ५३ धावा जोडल्या. स्टुअर्ट बिन्नी धावचीत झाल्यानंतर रहाणेला साथ मिळाली ती ब्रॅड हॉजची. या दोघांनी २९ चेंडूतच ५३ धावा फटकावल्या.

पहिल्या टप्प्यात संथ पवित्रा घेणाऱ्या रहाणेने नंतर मात्र आक्रमक खेळ करत राजस्थानला पावणेदोनशेचा टप्पा ओलांडून दिला. रहाणेने शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीवर राहण्याचे तत्व पाळताना ८ चौकार आणि षटकारासह नाबाद ६८ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

 राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ३ बाद १७९ (अजिंक्य रहाणे नाबाद ६८, दिशांत याग्निक ३४, शेन वॉटसन ३१, कीरॉन पोलार्ड १/२४) विजयी विरुद्ध मुंबई इंडियन्स : १८.२ षटकांत सर्वबाद ९२ (दिनेश कार्तिक ३०, अंबाती रायुडू २७, जेम्स फॉल्कनर ३/१

६)

सामनावीर : अजिंक्य रहाणे</p>

Story img Loader