IPL 2023 Playoff Equation: इंडियन प्रीमियर लीगच्या १६व्या मोसमात शुक्रवारी राजस्थान रॉयल्सचा सामना गुजरात टायटन्सशी झाला. या सामन्यात गुजरातने राजस्थानचा ९ गडी राखून पराभव केला. राजस्थान रॉयल्सच्या पराभवामुळे आता प्लेऑफची शर्यत खूपच रोमांचक बनली आहे. इतकंच नाही तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व्यतिरिक्त स्पर्धेत अत्यंत खराब सुरुवात करणाऱ्या मुंबई इंडियन्सलाही टॉप ४ मध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे.
गुजरात टायटन्सने १० सामन्यांत १४ गुण मिळवून अव्वल स्थान कायम ठेवले आहे. मात्र आता दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी संघांमध्ये अत्यंत चुरशीची स्पर्धा होऊ शकते. सध्या लखनऊ ११ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्जचेही ११ गुण आहेत, मात्र नेट रनरेटमध्ये पिछाडीवर असल्याने ते तिसऱ्या स्थानावर आहेत. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानी आहे.
त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सला गेल्या काही सामन्यांमध्ये केलेल्या खराब कामगिरीचा फटकाही सहन करावा लागला आहे. चांगल्या नेट रनरेटमुळे राजस्थान सध्या १० गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आरसीबी आणि मुंबई इंडियन्सचेही १०-१० गुण आहेत. मात्र, राजस्थानच्या तुलनेत या दोन्ही संघांचा नेट रनरेट खराब आहे.
सीएसकेलाही संधी आहे –
शनिवारी मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. जर या सामन्यात मुंबई इंडियन्स सीएसकेला पराभूत करण्यात यशस्वी ठरले, तर त्यांना पहिल्या तीनमध्ये थेट प्रवेश मिळण्याची संधी आहे. मात्र, आजच्या सामन्यात सीएसकेने मुंबई इंडियन्सचा पराभव केला, तर त्याचे १३ गुण होतील. यासह सीएसकेला प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी केवळ एका विजयाची आवश्यकता असेल. त्याचप्रमाणे शनिवारी आरसीबीचा संघही मैदानात उतरणार आहे. आरसीबीचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी आहे. जर आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला तर त्याचे १२ गुण होतील. आरसीबीचा नेट रन रेट मुंबई इंडियन्सपेक्षा खूपच चांगला असल्याने तो थेट नंबर दोनवर पोहोचू शकतो.
आयपीएलच्या ४८व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला आहे. शुक्रवारी (५ मे) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर गुजरात टायटन्सने त्यांचा नऊ गडी राखून पराभव केला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचा संघ १७.५ षटकांत ११८ धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात गुजरातने १३.५ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ११९ धावा करून सामना जिंकला.