Rashid Khan Smashes 10 Sixes Video Viral : मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात वानखेडे मैदानात आयपीएलचा ५७ वा सामना रंगला. मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमारने ४९ चेंडूत १०३ धावांची नाबाद शतकी खेळी. या धावांच्या जोरावर मुंबईने २१८ धावांपर्यंत मजल मारली आणि गुजरातला विजयसाठी तगडं आव्हान दिलं. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सच्या फलंदाजांची मुंबईच्या गोलंदाजांनी पुरती दमछाक केली. परंतु, अष्टपैलू खेळाडू राशिद खानने चार विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी तर केलीच. मात्र, राशिदने वानखेडे मैदानात ३ चौकार आणि १० षटकारांचा पाऊस पाडत ३२ चेंडूत ७९ धावांची नाबाद खेळी केली.
गोलंदाजी असो वा फलंदाजी मैदानात फक्त राशिद खानचाच जलवा दिसत होता. राशिदने शेवटच्या चेंडूपर्यंत धावा कुटल्या पण गुजरातला विजय मिळवून देण्यात यश मिळालं नाही. या सामन्यात मुंबईने गुजरातचा पराभव केला. मात्र राशिदच्या अप्रतिम खेळीनं लाखो क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली. राशिदने ठोकलेल्या षटकारांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
राशिदने धडाकेबाज फलंदाजी करत ३२ चेंडूत ७९ धावा कुटल्या. या इनिंगमध्ये राशिदने ३ चौकार आणि १० षटकार ठोकले. राशिदने २४६.८८ च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. राशिदच्या या धावांच्या जोरावर गुजरात टायटन्सने २० षटकात ८ विकेट्स गमावत १९१ धावा केल्या. राशिद खानने आक्रमक फलंदाजी करून मुंबईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. मुंबईचा विजय झाला पण राशिदच्या फलंदाजीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. राशिदच्या या खेळीमुळं मुंबई अजूनही (-) रन रेटमुळं गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्सने गमावली संधी
मुंबई इंडियन्स गुणतालिकेत १४ अंकांनी तिसऱ्या स्थानावर आहे. प्ले ऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी नेट रन रेटची महत्वाची भूमिका असते. गुजरात विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईला रन रेट (+) करण्याची संधी होती. परंतु राशिदने मुंबईच्या आशांवर पाणी फेरलं. सामना जिंकूनही मुंबई इंडियन्सची एनआरआर (NRR) -०.११७ एव्हढी आहे.