BCCI reprimands Rasikh Salam Dar : आयपीएल २०२४ मधील ४०वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दिल्लीत पार पडला. या सामन्यात दिल्लीने गुजरातविरुद्ध ४ धावांनी निसटता विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सचा युवा वेगवान गोलंदाज रसिख सलाम दारला मैदानावरील गैरवर्तन महागात पडले आहे. रसिक सलाम दारने बुधवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात असे कृत्य केले, ज्याबद्दल त्याला बीसीसीआयने फटकारले आहे. रसिक सलाम दार हा तोच गोलंदाज आहे, ज्याने बुधवारी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात ४४ धावांत ३ विकेट्स घेतल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रसिख सलाम दारला –

गुजरात टायटन्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात विकेट घेतल्यानंतर आक्रमक सेलिब्रेशन केल्याबद्दल दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज रसिख सलाम दारला फटकारण्यात आले आहे. अरुण जेटली स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने चार धावांनी विजय मिळवला. यादरम्यान, रसिख सलाम दार हा आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.५ च्या लेव्हल वन गुन्ह्यासाठी दोषी आढळला, जो दुसऱ्या खेळाडूला चिथावणी देणारी भाषा किंवा कृती किंवा हावभाव वापरण्याशी संबंधित आहे. त्याने गुन्हा कबूल केला असून मॅच रेफरीचा निर्णय त्याने स्वीकारला आहे. आचारसंहितेच्या लेव्हल वन उल्लंघनासाठी, सामनाधिकारीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.

रसिख सलाम दारने ३ विकेट्स घेतल्या –

रसिख सलाम दारने बुधवारी गुजरात टायटन्सचे फलंदाज साई सुदर्शन (६५), शाहरुख खान (८) आणि आर साई किशोर (१३) यांना बाद केले होते. कर्णधार ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्या अर्धशतकांमुळे आणि दोघांमधील शतकी भागीदारीमुळे दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा चार धावांनी पराभव केला. दिल्लीच्या २२५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टायटन्स संघ साई सुदर्शन (६५ धावा) आणि डेव्हिड मिलर (५५ धावा) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ८ गड्यांच्या मोबदल्यात २२० धावाच करू शकला.

हेही वाचा – ऋषभ पंतचा षटकार अन् कॅमेरामन जखमी; दिल्लीच्या कॅप्टनने केलेल्या VIDEO तील ‘त्या’ कृतीने जिंकले नेटिझन्सचे मन

गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स सहाव्या स्थानावर विराजमान –

साई सुदर्शनने सलामीवीर रिद्धिमान साहा (३९) सोबत दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावा जोडल्या. दिल्लीकडून रसिख सलाम दारने ३ तर कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या. एनरिक नॉर्खिया, मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. गुजरात टायटन्सला आयपीएल २०२४ मध्ये पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आता गुजरात टायटन्स संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ आता गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्याच्या आशा कायम आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rasikh salam dar was reprimanded for breaching the ipl code of conduct in the dc vs gt match in ipl 2024 vbm