Ravi Bishnoi Celebrates Six on Jasprit Bumrah Bowling Video: मुंबई इंडियन्सने वानखेडेच्या मैदानावर झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाचा ५४ धावांनी सर्वात मोठा पराभव केला आहे. जसप्रीत बुमराहने गोलंदाजी करताना या सामन्यात कमालीची गोलंदाजी केली आहे. बुमराहने एका षटकात ३ विकेट घेत संघाचा विजय निश्चित केला. बुमराहने ४ षटकांत ४ विकेट घेत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. पण बुमराहच्या गोलंदाजीवरील रवी बिश्नोईच्या षटकाराने सर्वांच लक्ष वेधलं.
मुंबई इंडियन्सने रिकल्टन आणि सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २१५ धावांचा टप्पा गाठला. तर लखनौने १९.५ षटकांत १६१ धावा करत संपूर्ण संघ ऑल आऊट झाला. लखनौकडून अखेरच्या षटकांमध्ये रवी बिश्नोईने प्रभावी फलंदाजी केली. पण मोठी गोष्ट म्हणजे बिश्नोईने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर षटकार खेचला. फक्त षटकारचं नाही खेचला तर त्याने याचं सेलिब्रेशनही केलं.
पहिल्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या लखनौचा फिरकीपटू रवी बिश्नोईने १३ धावांची खेळी केली, ज्यामध्ये दोन षटकारांचा समावेश होता. बुमराहच्या चेंडूवरील त्याचा षटकार पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्याचा धाडसी फटका पाहून लखनौचा कर्णधार ऋषभ पंत आणि मेन्टॉर झहीर खानही चकित झाले आणि हसू लागले. लखनौच्या डगआउटमध्ये बसलेले उर्वरित खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ देखील थक्क झाले.
१८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बिश्नोईने बुमराहच्या चेंडूवर षटकार मारला. चेंडू बराच पुढे गेला आणि प्रेक्षकांमध्ये जाऊन पडला. बुमराहने ऑफ स्टंपच्या लाईनवर फुल लेंथ चेंडू टाकला जो बिश्नोईने षठकारासाठी पाठवला. यानंतर, त्याने जोरदार सेलिब्रेशन करत या षटकाराचा आनंद साजरा केला. आधी त्याने हवेत मुक्का मारून आपला आनंद व्यक्त केला.
लखनौ कॅम्पही त्याचा फटका पाहून चकित झाला. पंतही चकित होत काय आहे हा असं म्हणत प्रतिक्रिया दिली. दरम्यान, झहीर हसताना दिसला. या षटकारानंतर बुमराह स्वतःही हसत हसत निघून गेला. त्याने सामन्यात शानदार गोलंदाजी केली आणि २२ धावा देऊन चार विकेट घेतल्या.
बिश्नोईने या सामन्यापूर्वी आयपीएलमध्ये कधीही षटकार मारला नव्हता. आता त्याने मुंबईविरूद्ध सामन्यात दोन षटकार मारले. बिश्नोईला नंतर कॉर्बिन बॉशने क्लीन बोल्ड करत माघारी धाडले. तो नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. मुंबईच्या २१५ धावांच्या प्रत्युत्तरात लखनौचा संघ १६१ धावांवरच गारद झाला. लखनौकडून आयुष बदोनीने सर्वाधिक ३५ आणि मिचेल मार्शने ३४ धावा केल्या. मुंबईविरूद्ध पराभवानंतर संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.