Ravi Shastri on T20I cricket: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या अनुभवी खेळाडूंनी आता कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, तर तिलक वर्मा, जितेश शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांसारख्या युवा खेळाडूंना टी२० मध्ये संधी दिली पाहिजे, असे भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे मत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली टी२० वर्ल्ड कप २०२२ नंतर या फॉरमॅटमध्ये एकही सामना खेळलेले नाहीत. हा संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळतो. मात्र त्याला नियमित कर्णधार बनवण्याची घोषणा अद्याप झालेली नाही.
माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले की, “रोहित, विराट कोहलीसारख्या खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध केले आहे. ज्या तरुणांनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे त्यांना संधी दिली पाहिजे जेणेकरून रोहित आणि विराटसारखे खेळाडू वन डे आणि कसोटीसाठी ताजेतवाने राहतील. इतका अनुभव असल्याने आता कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायला हवे. अवाजवी क्रिकेटपासून त्यांनी स्वतःच्या फिटनेसचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
यशस्वी, जितेश, तिलक आणि रिंकू सिंग या तरुणांनी २०२३ आयपीएल हंगामात चांगली कामगिरी केली आहे. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टी२० संघात स्थान मिळविण्यासाठी ते वाट आहेत. शास्त्री म्हणाले, “या खेळाडूंना वेस्ट इंडिजविरुद्धच्या पुढील टी२० मालिकेत संधी मिळायला हवी. निवडकर्त्यांनी त्यांची आतापासून तयारी करावी. अजून वेळ पाहण्याऐवजी, त्यांचा वर्तमान फॉर्म वापरला पाहिजे.”
“फ्रँचायझीसाठी टॉप ऑर्डरमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला भारतासाठी मधल्या फळीत मैदानात उतरवता कामा नये”, असेही ते म्हणाले. शास्त्री पुढे म्हणाले की, “व्यंकटेश अय्यरच्या बाबतीतही असेच झाले. जर एखाद्या खेळाडूने फ्रँचायझीसाठी तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि तुम्ही त्याला अचानक सहाव्या क्रमांकावर मैदानात उतरवले किंवा त्याला डावाची सुरुवात करण्यास सांगितले तर त्याचा फॉर्म खराब होऊ शकतो. असे होऊ नये हे माझे मत आहे. योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करावी.”
विकेटकीपरसाठी कोणती पोझिशन चांगली आहे
“यष्टीरक्षक फलंदाजासाठी सहा किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणे योग्य आहे, असे रवी शास्त्री यांचे मत आहे. ऋषभ पंतच्या दुखापतीशिवाय भारताकडे इशान किशन आणि संजू सॅमसन आहेत. जितेश शर्मा पंजाब किंग्जसाठी उत्कृष्ट फिनिशर ठरला.” माजी मुख्य प्रशिक्षक म्हणाले, “जर तुमच्याकडे चांगले सलामीवीर असतील तर तुम्हाला सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकणारा यष्टिरक्षक हवा. होय, जर तुमची सलामीची जोडी कमकुवत असेल तर एक यष्टीरक्षक शोधा जो वरपर्यंत फलंदाजी करू शकेल. हे सर्व संघांना लागू होते.”