चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रभावी खेळाडूच्या (इम्पॅक्ट प्लेयर) नियमावर भारताचा कर्णधार रोहित शर्मासह अन्य काही आजी-माजी खेळाडूंनी टीका केली असली, तरी रोहितचा संघ-सहकारी रविचंद्रन अश्विन आणि भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या नियमाचे समर्थन केले आहे. काळानुरूप बदलणे गरजेचे आहे, असे शास्त्री म्हणाले.
‘‘जेव्हा एखाद्या नव्या नियमाचा अवलंब केला जातो, तेव्हा काही लोकांकडून त्याला विरोध होतोच. नवा नियम कसा चुकीचा आहे हे त्यांच्याकडून दाखवले जाते. मात्र, ज्या वेळी १९०-२०० ची धावसंख्या सातत्याने पाहायला मिळते, खेळाडूंना अधिक संधी उपलब्ध होते आणि ते या संधीचे सोने करतात, तेव्हा लोक नियमाबाबत वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्यास सुरुवात करतात. प्रभावी खेळाडूचा नियम चांगलाच आहे. तुम्ही काळानुरूप बदलणे गरजेचे असते. अन्य खेळांमध्येही हे घडते. तुम्ही नवे नियम, बदल स्वीकारायला हवेत. प्रभावी खेळाडूच्या नियमामुळे सामने अधिक चुरशीचे होत आहेत,’’ असे मत शास्त्री यांनी अश्विनच्या ‘यूट्यूब’ चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
हेही वाचा >>> IPL 2024: दिल्लीने लखनऊवर मिळवला विजय अन् राजस्थान रॉयल्सने प्लेऑफमध्ये मारली धडक
या नियमानुसार, मैदानात खेळणाऱ्या ११ खेळाडूंव्यतिरिक्त आणखी पाच खेळाडू राखीव म्हणून निवडण्याची संघांना मुभा असते. त्यानंतर सामन्याच्या परिस्थितीनुसार, संघांना ११ जणांमधील एका खेळाडूच्या जागी राखीवमधील एका खेळाडूला ‘प्रभावी खेळाडू’ म्हणून उर्वरित सामन्यात खेळवता येते. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणारे संघ नंतर गोलंदाजीच्या वेळी एका फलंदाजाला बाहेर करून अतिरिक्त गोलंदाजाला संघात स्थान देतात. मात्र, या नियमामुळे भारतीय अष्टपैलूंच्या प्रगतीला खीळ बसत असल्याचे रोहित काही दिवसांपूर्वी म्हणाला होता. परंतु त्याचा भारतीय संघातील सहकारी अश्विनने थोडे वेगळे मत व्यक्त केले.
प्रभावी खेळाडूच्या नियमामुळे भारतीय खेळाडूंना अधिक संधी मिळत असल्याचे अश्विन म्हणाला. यासाठी त्याने यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलचे उदाहरण दिले. ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात प्रभावी खेळाडूचा नियम पहिल्यांदा वापरण्यात आला होता. त्यावेळी राजस्थान रॉयल्स संघाने बहुतांश सामन्यांत जुरेलला प्रभावी खेळाडू म्हणून खेळवले होते. या संधीचा पुरेपूर वापर करताना जुरेलने सर्वांना प्रभावित केले आणि त्यानंतर त्याच्यासाठी भारतीय कसोटी संघाची दारे खुली झाली.