भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तथा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली सध्या खराब कामगिरीमुळे चर्चेत आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोहली चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये. राजस्थानविरुद्धच्या सामन्यातही तो अवघ्या ९ धावा करुन झेलबाद झाला आहे. कोहलीची खराब कामगिरी ही भारतीय क्रिकेट संघासाठी चिंतेचा विषय ठरतेय. असे असताना आता भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीला सल्ला दिला आहे. विराटने सध्या ब्रेक घ्यायला हवा असं मत शास्त्री यांनी व्यक्त केलंय.

हेही वाचा >> रिकी पाँटिंगने दिल्ली कॅपिटल्सचा सामना पाहताना टिव्ही रिमोट का तोडले?

स्टार स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात रवी शास्त्री बोलत होते. यावेळी बोलताना “मागील अनेक वर्षांपासून कोहली कोणताही ब्रेक न घेता क्रिकेट खेळतोय. या काळात कोहलीने क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व केलेले आहे. त्यामुळे कोहलीने सध्या काही काळासाठी ब्रेक घ्यावा. हाच निर्णय त्याच्यासाठी शहाणपणाचा ठरेल,” असे शास्त्री म्हणाले. तसेच “कधीकधी तुम्हाला समतोल साधावा लागतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कारकीर्द सहा ते सात वर्षांपर्यंत लांबवायची असेल तर विराटने या आयपीएलमधून माघार घेणे गरजेचे आहे. त्याने विश्रांती घ्यावी,” असेदेखील शास्त्री म्हणाले.

हेही वाचा >> RR vs RCB : रियान पराग आणि हर्षल पटेलमध्ये मैदानातच खडाजंगी; सामन्यानंतरही वाद कायम

तसेच पुढे बोलताना रवी शास्त्री यांनी खेळाडूंना हव्या असणाऱ्या विश्रांतीचे महत्त्व सांगितले. “फक्त विराटच नव्हे तर आणखी दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला मी हेच सांगेन. भारतासाठी चांगला खेळ खेळायचा असेल तर तुम्हाला कोठे थांबायचे आहे? कोठे ब्रेक घ्यायचा आहे? हे ठऱवणे गरजेचे आहे. ज्यावेळी भारताने कोण्यात्याही स्पर्धेत भाग घेतलेला नसतो तेव्हा ब्रेक घेणे सोईस्कर ठरते. जेव्हा आयपीएल सुरु असतो तेव्हाच भारत कोणत्या स्पर्धेत सहभागी नसतो. त्यामुळे आयपीएलचा काळ हा खेळाडूसाठी ब्रेक घेण्यासाठी उत्तम आहे,” असे देखील रवी शास्त्री यांनी सांगितल.

हेही वाचा >> पुन्हा तेच! सलामीला येऊनही विराट कोहली फ्लॉप, दुसऱ्याच षटकात प्रसिध कृष्णाने तंबुत पाठवलं

दरम्यान, विराट कोहली सध्या वाईट काळातून जात आहे. जवळपास तीन वर्षे होऊन गेले मात्र कोहलीने अद्याप एकही शतक झळकावलेले नाही. राजस्थानसोबतच्या सामन्याआधी विराट कोहली दोन वेळा गोल्डन डकवर शून्यावर बाद झाला. राजस्थानसोबतच्या सामन्यातही तो खास कामगिरी करु शकला नाही. दहा चेंडूंमध्ये त्याला फक्त ९ धावा करता आल्या. कोहलीच्या याच खराब कामगिरीमुळे क्रिकेट जगतात चिंता व्यक्त केली जात आहे.

Story img Loader