Vaibhav Suryavanshi: भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कबूल केले की, राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याचे विक्रमी आयपीएल शतक आणि त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात पाहूण ते थक्क झाले आहेत. दरम्यान १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने २८ एप्रिल रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर टी-२० मध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावण्याचा विक्रमक केला आहे. अशात रवी शास्त्री यांनी वैभवसोबत संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

गुजरात विरुद्धच्या सामन्यात वैभवने ३८ चेंडूत १०१ धावा फटकावल्या होत्या. ज्यामध्ये सात चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता. वैभवच्या या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर आठ विकेट्सनी विजय मिळवला. वैभवने हे शतक फक्त ३५ चेंडूत केले, जे आयपीएलच्या इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले, यापूर्वी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने ३० चेंडूत झळकवले होते.

आयसीसी रिव्ह्यू विथ संजना गणेशन या कार्यक्रमात बोलताना रवी शास्त्री यांनी स्पष्ट केले की, वैभव सूर्यवंशीला या हंगामाच्या सुरुवातीला पहिल्यांदा फलंदाजी करताना पाहिले तेव्हाच त्याच्या रॉ टॅलेंटची कल्पना आली होती.

वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या त्याच्या पहिल्याच चेंडूवर मारलेल्या षटकाराचा संदर्भ देत रवी शास्त्री म्हणाले की, “मला वाटते की (लखनौविरुद्ध) त्याने खेळलेला पहिला फटका पाहिल्यानंतर सर्वांचे धाबे दणाणले होते.”

पण, माजी अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्री यांनी यावर भर दिला की, या प्रतिभावान खेळाडूच्या दीर्घकालीन भवितव्याबद्दल ठोस निष्कर्ष इतक्या लवकर काढणे कठीण आहे.

शास्त्री पुढे म्हणाले की, “तो तरुण आहे, त्याला खेळू द्या. या वयात अपयश येणेही निश्चित आहे. तो अपयशाला कशा प्रकारे हाताळतो हे पाहावे लागेल, कारण लोक प्रत्येक वेळी नवीन गोष्टी घेऊन येतील.”

शास्त्रींनी असेही भाकीत केले की, वैभव सूर्यवंशीचे पुढील आव्हान वेग आणि बॉउंस होणारे चेंडू हाताळणे असेल.

२८ एप्रिल २०२५ रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने क्रिकेट जगताचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २०९ धावांचा डोंगर उभा केला, ज्यामध्ये शुभमन गिल (८४) आणि जोस बटलर (२६ चेंडूत अर्धशतक) यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.

प्रत्युत्तरादाखल, वैभवने राजस्थान रॉयल्सकडून ३५ चेंडूत १०१ धावांची स्फोटक खेळी केली. या खेळी दरम्यान वैभव आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या खेळीमुळे राजस्थानने १५.५ षटकांत ८ गडी गमावून २१० धावांचे लक्ष्य गाठले. यावेळी वैभवला त्याचा सलामीच्या जोडीदार यशस्वी जयस्वालचीही उत्तम साथ लाभली. जयस्वालने ४० चेंडूत ७० धावांची शानदार खेळी केली.