Ravi Shastri On Virat Kohli : गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात झालेल्या वादाचे पडसाद संपूर्ण क्रीडाविश्वात उमटताना दिसत आहेत. या गंभीर प्रकरणामुळं विराट कोहली, नवीन उल हक आणि गौतम गंभीर यांच्यावर दंडात्कम कारवाई करण्यात आली होती. अशातच आता टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीला गौतम गंभीर प्रकरणावरून इशारा दिला आहे. शास्त्री यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, मैदानात खेळत असताना कॅमेराचं भान ठेवून वागण्याचा सल्लाही त्यांनी कोहलीला दिला आहे. कोहलीनं मैदानात खेळताना सचिन तेंडुलकर आणि एम एस धोनीसारख्या दिग्गज खेळाडूंचं उदाहरण समोर ठेवावं.
शास्त्री पुढे म्हणाले, आयपीएल २०२३ मध्ये कोहलीनं मनोरंजनाच्या अनेक गोष्टी केल्या आहेत. त्याने अप्रतिम फलंदाजीचा जलवाही दाखवला आहे. परंतु, मैदानात खेळत असताना त्याचा आक्रमक चेहराही अनेकांनी पाहिला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा मार्गदर्शक सौरव गांगुली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर या दोघांसोबत विराटचा वाद झाला होता. ही दोन्ही प्रकरणातून धडा घेऊन विराटने जागं व्हावं. कोहलीकडे आता सर्व कॅमेरांची नजर असणार आहे. सामना संपल्यानंतर त्याच्या सर्व हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. खेळाडूंशी हस्तांदोलन आणि त्यांच्यासोबत केला जाणारा संवाद कॅमेरात कैद केला जाणार आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना शास्त्री म्हणाले, धोनी आणि सचिन अशा प्रसंगांना सामोरे गेले आहेत. पण ते दोघेही अशा परिस्थितीत खूप प्रोफेशनल वागले आहेत. कोहलीनं कॅमेरासमोर सावध राहावं आणि मैदानात चांगलं प्रदर्शन करावं. तुम्ही मैदानात जी कामगिरी करता यावर सर्वांचं लक्ष असतं. तुम्ही सामन्यात कशाप्रकारे खेळ खेळला, याचा कॅमेरा साक्षीदार असतो. सचिन आणि धोनीला या गोष्टींचा चांगला अनुभव आहे. तुम्ही ड्रेसिंग रुममध्ये जाण्याआधी कॅमेरा तुमच्यासोबत असतो. त्यामुळे तुम्हाला सावध राहावं लागतं. या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक हाताळल्या आणि सामना संपला की, सर्वकाही ठीक असतं.”