Ravindra Jadeja Smashes Four And Six To Win IPL 2023 Trophy : आयपीएलच्या १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने जेतेपदावर नाव कोरंल आहे. आयपीएलच्या इतिहासात चारवेळा जेतेपद जिंकणाऱ्या चेन्नईने धोनीच्या नेतृत्वात यंदाच्या हंगामातही आयपीएलचा किताब जिंकला आहे. चेन्नईने आता पाचवेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली असून मुंबई इंडियन्सशी बरोबरी केली आहे. शेवटच्या षटकातील दोन चेंडूंवर १० धावांची आवश्यकता असताना चेन्नईचा स्टार फलंदाज रविंद्र जडेजा स्ट्राईकवर होता. मोहित शर्माने पहिल्या चार चेंडूत गुजरातच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र शेवटच्या दोन चेंडूवर चौकार आणि षटकार ठोकून जडेजाने गुजरातच्या विजयाच्या आशांवर पाणी फेरलं आणि चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल २०२३ चा किताब जिंकण्यात यशस्वी ठरली. जडेजाच्या धडाकेबाज फलंदाजीचं सर्वत्र कौतुक होत असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

चेन्नई सुपर किंग्जसाठी सलामीला मैदानात उतरलेल्या ऋतुराज गायकवाडने १६ चेंडूत २६ धावा केल्या. तर डेवॉन कॉन्वेनं २५ चेंडूत ४७ धावांची खेळी साकारली. पण हे दोन्ही फलंदाज नूर अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाले. त्यानंतर अजिंक्य रहाणेनं १३ चेंडूत २७ धावा केल्या. रहाणेला मोहित शर्माने बाद केल्यानंतर अंबाती रायुडूने १९ धावा केल्या. पण तोही मोहितच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर चेन्नईचा कर्णधार एम एस धोनी मैदानात उतरला पण धोनी या सामन्यात शून्यावर बाद झाला. पण रविंद्र जडेजा आणि शिवम दुबेनं गुजरातच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. दुबे २१ चेंडूत ३२ धावा करून नाबाद राहिला. तर जडेजानं १५ धावांची नाबाद खेळी केली.

मागील चार सामन्यांत तीन शतक ठोकून इतिहास रचणाऱ्या शुबमनकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर शुबमनचा दीपक चहरने झेल सोडला आणि जडेजाला जीवदान मिळालं. त्यानंतर या संधीचा फायदा घेत शुबमनने आक्रमक फलंदाजी करत मैदानात धावांचा पाऊस पाडला. शुबमन चौफेर फटकेबाजी करत असताना चेन्नईचा कर्णधार एम एस धोनीनं रणनिती आखली अन् रविंद्र जडेजाला गोलंदाजी दिली. त्यानंतर जडेजाने फसवा चेंडू फेकून शुबमनला चकवा दिला अन् धोनीनं गिलला ३९ धावांवर असताना पायचित केलं. शुबमनने २० चेंडूत ३९ धावांची खेळी साकारली. शुबमनचा झंझावात रोखण्यात धोनीला यश आलं.

Story img Loader