IPL 2025 CSK vs RCB Highlights in Marathi: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चेन्नई सुपर किंग्सवर धुव्वाधार विजय मिळवला आहे. चेपॉकच्या मैदानावर आरसीबीने ५० धावांनी मोठा विजय नोंदवला. आरसीबीने २००८ नंतर म्हणजेच ६१५५ दिवसांनंतर चेन्नईच्या घरच्या मैदानावर विजयाची चव चाखली. धोनी मैदानावर असूनही सीएसकेच्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. संपूर्ण सामन्यात आरसीबीच्या संघाने सीएसकेवर दबाव कायम ठेवला.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत आरसीबीने दिलेल्या १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेची सुरूवात खूपच खराब झाली. सीएसकेला दुसऱ्याच षटकात २ विकेट्सचा धक्का बसला, यानंतर सीएसके या धक्क्यांमधून सावरू शकली नाही. हेझलवूडने दुसऱ्या षटकात राहुल त्रिपाठी ५ धावा करत तर ऋतुराज गायकवाड खातेही न उघडता झेलबाद झाला. यानंतर दिपक हुडा ४ धावा तर सॅम करन ८ धावा करत बाद झाले. तर रचिन रवींद्र एका टोकाकडून संघाचा डाव धरून होता. रचिन रवींद्र ३१ चेंडूत ५ चौकारांसह ४१ धावा करत बाद झाला. तर शिवम दुबे १९ धावा करत बाद झाला. जडेजा २५ धावा, तर आर अश्विन ११ धावा करत बाद झाला. तर धोनीने १६ चेंडूत ३ चौकार आणि २ षटाकारांसह ३० धावांची नाबाद खेळी केली.

यश दयालने देखील १३व्या षटकात रचिन रवींद्र आणि शिवम दुबेला बाद करत चेन्नईच्या विजयाच्या आशांवर पाणी फेरलं. संपूर्ण सामन्यात आरसीबीचा संघ चेन्नईपेक्षा एक पाऊल पुढे होता आणि शेवटपर्यंत आरसीबीने हाच दबाव कायम ठेवला. आरसीबीकडून जोश हेझलवूडने ३, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन यांनी २-२ विकेट तर भुवनेश्वर कुमारने १ विकेट घेतली.

तत्पूर्वी सीएसकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आरसीबीला फलंदाजासाठी पाचारण केले. फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी संघाला एकदम ‘रॉयल’ अंदाजात सुरूवात करून दिली. या दोघांनी मिळून पॉवरप्लेमध्ये ५६ धावा उभारल्या. धोनीच्या चपळाईपुढे फिल सॉल्टला स्टम्पिंग करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. फिल सॉल्ट १६ चेंडूत ३२ धावा करत बाद झाला. तर विराट कोहलीने ३० चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह ३१ धावा केल्या.

यानंतर आलेल्या देवदत्त पडिक्कलच्या खेळीने सर्वांनाच प्रभावित केलं. त्याने छोटी पण प्रभावी खेळी खेळत १४ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २७ धावा केल्या आहेत. यानंतर कर्णधार रजत पाटीदारने ३२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५१ धावा केल्या. लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा एकेक मोठे फटके खेळत बाद झाला. संघाला चेन्नईविरूद्ध विजय मिळवायचा असल्यास संघाला २०० धावांचा पल्ला गाठणं महत्त्वाचं होतं आणि ही कामगिरी टीम डेव्हिडने पूर्ण केली. टीम डेव्हिडने ८ चेंडूत ४ षटकार आणि एका चौकारासह २२ धावा केल्या. डेव्हिडने अखेरच्या षटकात सलग तीन षटकार लगावत संघाची धावसंख्या १९६ धावांवर नेऊन ठेवली. सीएसकेच्या संघाला त्यांच्या खराब फिल्डिंगचा मोठा फटका बसला, त्यांनी रजत पाटीदार ३ झेल सोडले आणि सामनावीर ठरलेल्या रजतने संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी खेळली.