RCB vs GT Highlights: आरसीबीने घरच्या मैदानावर मोठा विजय मिळवत गुजरातचा ४ विकेट्सने पराभव केला. गुजरातला पराभूत केल्यानंतर आरसीबीने १०व्या क्रमांकावरून थेट सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना जिवंत ठेवले आहे. तर आरसीबीने हा सामना जिंकत मुंबईला धक्का दिला आहे, मुंबई इंडियन्सचा संघ आता गुणतालिकेत शेवटच्या स्थानी पोहोचला आहे. आरसीबीच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्त्वाखाली संघाने यंदाच्या मोसमातील सर्वात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विराट कोहली आणि फाफच्या फलंदाजीने संघाला एक जबरदस्त सुरूवात करून दिली. या दोघांनी आरसीबीसाठी पॉवरप्लेमध्ये ९२ धावांची सर्वात मोठी भागीदारी रचली. नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय संघाच्या पथ्यावर पडला. आरसीबीच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन दाखवत गुजरातच्या फलंदाजांना फार काळ टिकू दिले नाही.
गुजरातने दिलेल्या १४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट आणि फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक ९२ धावांची भागीदारी रचली. फाफने आरसीबीसाठी दुसरे सर्वात जलद अर्धशतक झळकावले. फाफने २३ चेंडूत ३ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या. तर विराटने २७ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या. यानंतर विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमरून ग्रीन यांनी झटपट विकेट गमावल्याने आरसीबीला लागोपाठ ४ धक्के बसले.
या सामन्यात दिनेश कार्तिक पुन्हा एकदा आरसीबीसाठी तारणहार ठरला. दिनेश कार्तिक आणि स्वप्नील सिंग यांनी मैदानावर टिकून राहत संघाला विजय मिळवून दिला. कार्तिकने १२ चेंडूत ३ चौकारांसह २१ धावा केल्या, तर स्वप्निलने ९ चेंडूत १ षटकार आणि २ चौकारांसह १५ धावा केल्या.
गुजरातकडून जोशुआ लिटीलने सर्वाधिक ४ विकेट्स घेत आरसीबीला घाम फोडला होता. तर नूर अहमदने दोन विकेट्स मिळवल्या.
तत्त्पूर्वी गुजरातने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १४७ धावा केल्या. आरसीबीच्या गोलंदाजीपुढे गुजरातच्या फलंदाजांनी तर पार गुडघे टेकले. एकाही फलंदाजाला फार काळ मैदानावर टिकू दिले नाही. गुजरातच्या एकाही फलंदाजाने ४० धावांचा आकडा गाठला नाही. यासह गुजरातने ३ बाद २३ धावांसह आयपीएल २०२४ मधील पॉवरप्लेमधील सर्वात कमी धावसंख्या केली आहे. जीटीचे पहिले तीन फलंदाज साहा, गिल आणि साई अनुक्रमे १,२ आणि ६ धावा करून बाद झाले. त्यानंतर आलेल्या शाहरूख खान (३७) आणि डेव्हिड मिलरने (३०) संघाचा डाव सावरला, पण मोठी धावसंख्या गाठू शकले नाही. त्यानंतर राहुल तेवतियाने २१ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांसह ३५ धावा केल्या. तर राशीद खान(१८), विजय शंकर (१०) हे झटपट बाद झाले. तर अखेरच्या षटकात मानव सुतार, मोहित शर्मा (धावबाद) आणि नूर अहमद हे शेवटच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर बाद झाले. मोहित शर्मा धावबाद झाल्याने विजयकुमार वैशाखची हॅटट्रिक मात्र चुकली.
आरसीबीकडून सिराज, यश दयाल आणि विजयकुमार वैशाख यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवले. तर कर्ण शर्माला एक विकेट मिळवण्यात यश आले.