IPL 2025 KKR vs RCB Highlights in Marathi: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने विजयाने सुरूवात केली आहे. आरसीबीने केकेआरला त्यांच्या घरच्या मैदानावर ७ विकेट्सने पराभूत केलं. आरसीबीने ३ वर्षांनंतर केकेआरवर शानदार विजय मिळवला आहे. विराट कोहली आणि फिल सॉल्टची ९५ धावांची भागीदारी अन् विराट कोहलीच्या धावांसह आरसीबीने पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट विजय नोंदवला. गतविजेत्या केकेआर संघाला अटीतटीची लढत देत सामन्यात दणक्यात पुनरागमन करत मोठा विजय नोंदवला.
पहिल्याच सामन्यात आरसीबीने चमकदार कामगिरी करत गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा घरच्या मैदानावर पराभव केला. २२ मार्च रोजी ईडन गार्डन्सवर झालेल्या सलामीच्या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १७५ धावांचे लक्ष्य दिे होते. आरसीबीने हे लक्ष्य अवघ्या १६.२ षटकांत गाठले. विराट आणि सॉल्टने वादळी सुरूवात करत ९५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
बेंगळुरूने कोलकाताविरुद्ध आयपीएलमध्ये ३ वर्षानंतर विजय मिळवला आहे. यापूर्वी २०२२ च्या मोसमात आरसीबीने केकेआरचा पराभव केला होता. या दमदार विजयासह आरसीबीने गुणतालिकेत आपले खातेही उघडले आहे. आरसीबीने १७व्या षटकात हा सामना जिंकल्याने त्यांचा नेट रन रेटही चांगला झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या या दमदार विजयात फिल सॉल्ट, विराट कोहली, कृणाल पंड्या आणि नवा कर्णधार रजत पाटीदार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तिघांनीही आपल्या स्फोटक फलंदाजीने सामन्यात एकतर्फी विजय मिळवला आणि केकेआरला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. १७ धावांचा पाठलाग करताना सॉल्ट आणि कोहलीने पहिल्या ६ षटकांत ८० धावा केल्या. या दोघांनी केवळ ८.३ षटकांत ९५ धावांची सलामी भागीदारी रचली.
१८० च्या स्ट्राईक रेटने ३१ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ५६ धावा करून सॉल्ट वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर बाद झाला. देवदत्त पडिक्कलही १० चेंडूत १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, पण या दोघांच्या बाद झाल्याचा बंगळुरूवर फारसा परिणाम झाला नाही. यानंतर आलेल्या कर्णधार रजत पाटीदारने १६ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ३४ धावा करत संघाचा विजय सोपा केला. याशिवाय लियाम लिव्हिंगस्टोनने ५ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह १५ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयात विराट कोहलीची भूमिका महत्त्वाची होती. सलामीला आलेला विराट ३६ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ५९ धावा करत नाबाद परतला.
तत्त्पूर्वी नाणेफेक गमावत केकेआरचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. पहिल्याच षटकात क्विंटन डिकॉकने चौकारासह सुरूवात केली. यानंतर सुयश शर्माने त्याचा साधा झेल सोडला. पण अखेरीस हेझलवूडने त्याला पहिल्याच षटकात झेलबाद करत संघाला पहिली विकेट मिळवून दिली. यानंतर केकेआरकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी करत आणि सुनील नरेन यांनी शतकी भागीदारी करत १० षटकांच्या आत १०० धावा केल्या. पण आरसीबीने आपली गोलंदाजी सुरू ठेवत रसिख दर सलामने संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यानंतर आरसीबीला दिलासा मिळाला.
रहाणेने ३१ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ५६ धावा करत बाद झाला तर सुनील नरेन २६ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटाकारांसह ४४ धावा केल्या. कृणाल पंड्याने अजिंक्य रहाणेला बाद करताच आरसीबीने सामन्यात पुनरागमन केलं. तर वेंकटेश अय्यर आणि रिंकू सिंहला क्लीन बोल्ड करत पंड्याने सामना फिरवला. याशिवाय अंगक्रिश रघुवंशीने ३० धावांची खेळी केली. पण इतर कोणताही फलंदाज १५ धावाही करू शकला नाही. आरसीबीकडून हेझलवूडने २, कृणाल पंड्याने ३ आणि यश दयाल रसिख सलाम, सुयश शर्मा यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.