IPL 2025 MI vs RCB Highlights in Marathi: आरसीबीने १० वर्षांनंतर वानखेडेचं चक्रव्यूह भेदत रोमांचक विजयाची नोंद केली आहे. आरसीबीने मुंबई इंडियन्सचा त्यांच्याच घरच्या मैदानावर १२ धावांनी पराभव केला. आरसीबीनं मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियवर १० वर्षांनी विजय मिळवला. कृणाल पंड्या, विराट कोहली आणि रजत पाटीदार आरसीबीच्या विजयाचे हिरो ठरले.

मुंबईला विजयासाठी अखेरच्या षटकात १९ धावांची गरज होती. कर्णधार रजत पाटीदारने कृणाल पंड्याला गोलंदाजी दिली. कृणालने पहिल्या दोन चेंडूवर विकेट घेतले. पहिल्या चेंडूवर सँटनर तर दुसऱ्या चेंडूवर दीपक चहर झेलबाद झाला. तिसऱ्या चेंडूवर बोल्टने १ धाव घेतली. तर चौथ्या चेंडूवर नमनने चौकार लगावला. तर पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात नमन धीर झेलबाद झाला. तर अखेरच्या चेंडूवर त्याने एकही धाव दिली आणि अशारितीने कृणालने संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

आरसीबीने दिलेल्या २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्स संघाची सुरूवात पुन्हा एकदा फारशी चांगली झाली नाही. रोहित शर्मा ९ चेंडूत २ चौकार आणि एक षटकार लगावत १७ धावा करून बाद झाला. तर काही वेळाने रायन रिकल्टनही १७ धावा करत पायचीत झाला. धावा काढण्यासाठी झगडत असलेला विल जॅक्स २२ धावा करत बाद झाला.

तर सूर्यकुमार यादव घरच्या मैदानावर २८ धावा करत बाद झाला. गेल्या सामन्यात १९व्या षटकात ज्याला रिटायर्ड आऊट केलं तो तिलक वर्मा २९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५६ धावा करत बाद झाला. संघाकडून अर्धशतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज ठरला.

हार्दिक पंड्याने वादळी फलंदाजी करत विजयाच्या दिशेने आणून ठेवला. पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याच्या भागीदारीने सामना मुंबईच्या बाजूने वळवला होता. पण मुंबईचा संघ पुन्हा एकदा विजयाच्या जवळ येऊन सामना जिंकू शकला नाही. हार्दिक पंड्या १५ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ४२ धावा करत झेलबाद झाला. यानंतर सँटनर ८ धावा करत झेलबाद झाला. तर दीपक चहरही पहिल्याच चेंडूवर झेलबाद होत माघारी परतला.

आरसीबीच्या गोलंदाजांनी वानखेडेच्या मैदानावर शानदार गोलंदाजी करत मुंबईला विजयापासून रोखले. कृणाल पंड्याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर यश दयाल आणि जोश हेझलवुजने २-२ विकेट तर भुवनेश्वर कुमारने १ विकेट घेतली. सुयश शर्माला विकेट मिळाली नसली तरी त्याने चांगली गोलंदाजी केली.

मुंबई इंडियन्स वि. आरसीबी यांच्यात एक अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बोल्टने पहिल्याच षटकात दुसऱ्या चेंडूवर फिल सॉल्टला क्लीन बोल्ड करत शानदार सुरूवात करून दिली. पण या सुरूवातीनंतरही आरसीबीने विराट-पडिक्कल-रजतच्या खेळीवर २२१ धावांची मोठी धावसंख्या उभारली.

आरसीबीकडून विराट कोहलीने ४२ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ६७ धावा केल्या. तर देवदत्त पडिक्कलने २२ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३७ धावांची खेळी केली. तर सामनावीर ठरलेल्या रजत पाटीदारने ३२ चेंडूत वादळी फटकेबाजी करत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या. यानंतर धावसंख्या २२१ वर नेण्याचं पुढचं काम जितेश शर्माने केलं. १९ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह त्याने ४० धावा केल्या. यादरम्यान त्याने बुमराहच्या अखेरच्या षटकात षटकारही लगावला. मुंबईकडून बोल्ट आणि हार्दिकने २-२ विकेट घेतले तर विघ्नेश पुथूरने एक विकेट घेतली.