IPL 2025 PBKS vs RCB Highlights in Marathi: चेस मास्टर विराट कोहली आणि देवदत्त पड्डिकल यांच्या शतकी खेळीच्या जोरावर आरसीबीने पंजाबचा त्यांच्या घरच्या मैदानावर ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. आरसीबीने पंजाबचा पराभव करत यंदाच्या मोसमातील पराभवाचा बदला घेतला आहे. आरसीबी संघाने पंजाबविरूद्ध सहज विजय मिळवला. यासह, आरसीबीने पंजाब संघाकडूनही बदला घेतला.

खरंतर, या हंगामात या दोन्ही संघांमधील ही दुसरी लढत होती. याआधी १८ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात पंजाबने आरसीबीला त्यांच्याच घरच्या मैदानावर ९५ धावांवर गुंडाळले होते आणि ५ विकेट्सने विजय मिळवला होता. पावसामुळे हा सामना १४ षटकांता झाला होता. त्यानंतर या सामन्यात आरसीबीकडून दमदार कामगिरी दिसून आली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला हा निर्णय योग्य ठरतो की नाही अशी शंका होती, पण नंतर कृणाल पंड्याच्या गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीने सामन्यात पुनरागमन केलं. पंजाबच्या फलंदाजांना कमी धावसंख्येपर्यंत रोखण्यात आरसीबीच्या गोलंदाजांना यश आले. पंजाब संघाने २० षटकांत ६ गडी गमावून फक्त १५७ धावा केल्या.

पंजाबने दिलेल्या १५८ धावांचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. १ धाव केल्यानंतर फिल सॉल्टने आपली विकेट गमावली. पण यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी शतकी भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. दोन्ही फलंदाज अर्धशतकं करण्यात यशस्वी झाले. तर विराट कोहली संघाला विजय मिळवून देत नाबाद परतला.

देवदत्त पडिक्कलने १७४.२८ च्या स्ट्राईक रेटने ३५ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ६१ धावा केल्या. विराट कोहलीने ५४ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ७३ धावा केल्या, ज्यामुळे आरसीबीला ३ गडी गमावून लक्ष्य गाठता आले.

पंजाब किंग्सच्या फलंदाजीला कमालीची सुरूवात झाली, पण दोन्ही खेळाडू मोठी धावसंख्या करू शकले नाहीत. पंजाब संघाने २० षटकांत ६ गडी गमावून १५७ धावांचा टप्पा गाठला. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक ३३ धावा केल्या. तर शशांक सिंगने ३१ धावांची नाबाद खेळी करत संघाला या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. जोश इंगलिसनेही २९ धावा केल्या आणि मार्को यान्सन २५ धावांवर नाबाद राहिला.

दुसरीकडे, कृणाल पांड्या आरसीबीचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने त्याच्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये फक्त २५ धावा देत २ फलंदाजांना बाद केले. सुयश शर्मानेही ४ षटकांत २६ धावा देत २ विकेट घेतले. या व्यतिरिक्त, रोमारियो शेफर्डने श्रेयस अय्यरच्या रुपात मोठी विकेट मिळवली. भुवनेश्वर कुमारनेही किफायतशीर गोलंदाजी केली.

आरसीबीचा हा ८ सामन्यांमधील ५ वा विजय आहे. आता या हंगामात ५ संघांचे १०-१० गुण आहेत. त्याच वेळी, पंजाबला ८ सामन्यांतील तिसरा पराभव पत्करावा लागला आहे.