IPL 2023 Faf Du Plesis Slams RCB: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि ट्रॉफीमधील अंतर आणखी एका वर्षाने वाढले आहे. रविवारी प्ले-ऑफच्या शर्यतीत गतविजेत्या गुजरात टायटन्स समोर पराभूत होऊन आरसीबी स्पर्धेतून बाहेर पडले. तर हे स्थान गुजरातच्या विजयासह मुंबई इंडियन्सच्या पदरी आले. विराट कोहलीच्या ६१ चेंडूत नाबाद १०१ धावांचा समावेश असलेल्या गुजरातसाठी १९८ धावांचे कठीण लक्ष्य असूनही, गुजरातने पाच चेंडू राखून लक्ष्य पूर्ण केल्याने आरसीबीला सहा विकेट्सने गारद केले.
चिन्नास्वामी स्टेडियमवर शुबमन गिलने आरसीबीविरुद्ध शतक ठोकले. तरीही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आरसीबीने तोडीस तोड टक्कर दिली पण अखेरीस आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आपला संघ अंतिम चार मध्ये येण्यासाठी “पात्रच नव्हता” अशी कबुली दिली आहे. फाफ डू प्लेसिसने अगदी तिखट शब्दात स्वतःच्याच संघावर ताशेरे ओढले आहे.
फाफ म्हणाला की “अर्थात स्पर्धेतून बाहेर पडताना आम्ही निराश आहोत पण जर आम्ही स्वतःकडे कठोरपणे पाहिलं तर आम्ही प्रामाणिकपणे सांगू की, आम्ही स्पर्धेतील सर्वोत्तम संघांपैकी एक नव्हतो, आम्ही नशीबवान होतो की संपूर्ण हंगामात खरोखरच काही चांगली कामगिरी झाली होती परंतु, संपूर्ण एक संघ म्हणून, आपण १४-१५ खेळांकडे पाहिल्यास, आम्ही कदाचित उपांत्य फेरीत जाण्यास पात्र नव्हतोच. या वर्षी मॅक्सी (ग्लेन मॅक्सवेल) च्या रूपात काही सकारात्मक गोष्टी पाहता आल्या, मोहम्मद सिराज उत्तम फॉर्ममध्ये होता, विराटबरोबर मी सुद्धा जवळपास प्रत्येक सामन्यात ५० धावांची भागीदारी सातत्याने केली पण अखेरीस दुर्दैवाने आम्ही बाहेर पडलो.”
हे ही वाचा<< विराट कोहलीचा दुःखी चेहरा अन्…नवीन उल हकने पुन्हा शोधली डिवचण्याची संधी, Video पाहून भडकले फॅन्स
दरम्यान, आता नवीन आकडेवारीनुसार आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्स, लखनऊ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स व चेन्नई सुपर किंग्ज हे चार संघ प्लेऑफमध्ये आमनेसामने येणार आहेत. आजपासून प्लेऑफला सुरुवात होत असून गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे.