RCB Opens Hindi Social Media Account Fans Reaction: RCB ने IPL 2025 च्या लिलावात अनेक नवीन आणि तरुण खेळाडूंना संघात सामील केलं आहे. मात्र, मेगा लिलावात संघाने आपल्या जुन्या खेळाडूंना परत संघात सामील केले नाही आणि नव्या खेळाडूंना संघबांधणी करताना संधी दिली आहे. आयपीएल २०२५ चा दोन दिवस चालणारा लिलाव संपल्यानंतर आरसीबीने संपूर्ण संघ कसा आहे, याचा खेळाडूंसह एक फोटो शेअर केला आहे. आरसीबीने आपल्या नवीन संघाची माहिती हिंदीत दिली आहे. यानंतर सोशल मीडियावर वाद सुरू झाला. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.
आयपीएल लिलावात आरसीबीने अनुभवी तसेच युवा खेळाडूंवर बोली लावली आहे. आरसीबी आयपीएलचा नवा हंगाम नव्या संघासह खेळण्यासाठी सज्ज आहे. पण यादरम्यान आरसीबी संघाने आपलं नवं हिंदी अकाऊंट सुरू केलं आहे. आरसीबीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हिंदी असं नवं नाव या अकाऊंटला दिलं आहे. टीमने आपल्या नवीन हिंदी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे हिंदीमध्ये ही माहिती दिली आणि लिहिले की, आयपीएल २०२५ ची आमची मजबूत संघ सादर करत आहोत.
आरसीबीने हिंदीत केलेली पोस्ट वादाचे कारण ठरली आहे. या पोस्टवर काही कन्नड चाहत्यांनी आक्षेप घेतला. या चाहत्यांचा असं म्हणणं आहे की आरसीबीचा बहुतांश चाहतावर्ग कन्नड भाषिक आहे. त्यामुळे आरसीबीने त्यांच्याच भाषेत पोस्ट शेअर करायला हवी होती. आता कन्नड चाहत्यांना आरसीबीने हिंदीमध्ये पोस्ट शेअर करणे पसंतीस पडले नाही. त्यानंतर कन्नडचे चाहते हिंदी भाषेला सतत विरोध करत आहेत.
आरसीबीच्या नवीन हिंदी सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टवर एका कन्नड चाहत्याने लिहिले की हिंदीचा बेंगळुरूशी काही संबंध नाही. जर तुम्हाला हा मेसेज इतर ठिकाणी पाठवायचा असेल तर तुम्ही कन्नड आणि इंग्रजी भाषा वापरू शकता. दुसऱ्या युजरने लिहिले की, हिंदीमध्ये सोशल मीडिया पेजची गरज नाही.
आरसीबीने या पेजवर विराट कोहली, कृणाल पंड्या, जितेश शर्मा आणि लियाम लिव्हिंहस्टोन या खेळाडूंचे हिंदी व्हीडिओही शेअर केले आहेत. पण चाहत्यांनी मात्र आरसीबीच्या या अकाऊंटवर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे.
IPL 2025 च्या मेगा लिलावात RCB ने एकूण ८२.२५ कोटी खर्चून खेळाडूंना संघात सामील केलं. व्यवस्थापनाने यावेळी फिल सॉल्ट, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, देवदत्त पड्डिकल, कृणाल पंड्या, दीपक हुडा यांना संघात सहभागी केले आहे. संघाने आपले जुने खेळाडू फाफ डु प्लेसिस, विल जॅक्स आणि मोहम्मद सिराज यांना लिलावात बोली न लावताच सोडून दिले. विराट कोहली आरसीबीचे नेतृत्व करेल असे मानले जात आहे. आयपीएल २०२२ पूर्वी त्याने आरसीबीचे कर्णधारपद सोडले. मात्र १५ वर्षांनंतर त्याच्यावर पुन्हा ही जबाबदारी येण्याची शक्यता आहे.