आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात १२ वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. विजय मिळवून गुणतालिकेत वरचे स्थान गाठण्यासाठी आज दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करणार आहेत. दरम्यान, आजच्या सामन्यात बंगळुरु संघाला ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डामुळे मोठा फटका बसणार आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या नियमामुळे बंगळुरुचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आजचा सामना खेळू शकणार नाही.
हेही वाचा >>> IPL 2022, RRvsRCB | दोन विजयामुळे राजस्थानचा आत्मविश्वास वाढला, तर बंगळुरुकडे विराट हुकुमी एक्का, कोणाचं पारडं जड ?
बंगळुरुचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल लग्न आटोपून १ एप्रिल रोजी भारतात आलेला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने त्याला रिटेन केलेले आहे. मात्र लग्न उरकून तो आयपीएल खेळण्यासाठी भारतात आलेला असला तरीदेखील त्याला आजच्या सामन्यात खेळता येणार नाही. ऑस्ट्रेलिय क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही खेळाडूला ६ एप्रिलपर्यंत आयपीएलमध्ये सहभागी होता येणार नाही, असे सांगितलेले आहे. याच कारणामुळे तीन दिवसांच्या विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करुनदेखील मॅक्सवेलला आजच्या सामन्यात खेळता येणार नाही.
हेही वाचा >>> लखनऊच्या केएल राहुलने रचला ‘हा’ नवा विक्रम; विराट कोहली, रोहित शर्माच्या पंक्तीत मिळवलं स्थान
दरम्यान, ग्नेल मॅक्सवेल धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू असून त्याच्या कामगिरीमुळे बंगळुरुने त्याला रिटेन केलेले आहे. मात्र आजच्या सामन्यात तो नसल्यामुळे याचा फटका बंगळुरुला बसण्याची शक्यता आहे. आतापर्यंत दोन सामने जिंकलेल्या राजस्थानशी दोन हात करण्यासाठी बंगळुरुला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे.