सातत्यपूर्ण कामगिरी करत एकामागून एक विजय मिळवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला आता वेध लागले आहेत, ते ‘प्ले ऑफ’चे. बुधवारी बंगळुरुपुढे आव्हान असेल ते आव्हान संपुष्टात आलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबचे. त्यामुळे या सामन्यात पंजाबपेक्षा निश्चितच बंगळुरुचे पारडे जड समजले जात आहे.
बंगळुरुचे ११ सामन्यांमध्ये १३ गुण झाले असून सध्याच्या घडीला ते पाचव्या स्थानावर आहेत. त्यामुळे पंजाबविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यास त्यांना ‘प्ले ऑफ’च्या दिशेने कूच करता येणार आहे. दुसरीकडे पंजाबचे आव्हान संपुष्टात आल्याने त्यांची कामगिरीही चांगली होताना दिसत नाही. यापूर्वी या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात बंगळुरुने पंजाबवर १३८ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता.
बंगळुरुच्या फलंदाजीतील तिन्ही अव्वल फलंदाज सध्या जबरदस्त फॉर्मात आहेत. गेल्या सामन्यात ए बी डी व्हिलियर्सची खेळी नजरेचे पारणे फेडणारी होती. ख्रिस गेल आणि कर्णधार विराट कोहलीही चांगल्या फॉर्मात आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीमध्ये या तिघांनीही स्थान पटकावले असून यावरून त्यांचा फॉर्मचा अंदाज घेता येऊ शकतो. गोलंदाजीमध्ये मिचेल स्टार्क भन्नाट फॉर्मात आहेत. स्टार्कला श्रीनाथ अरविंद, डेव्हिड वाइस आणि युझवेंद्र चहल चांगली साथ देत आहेत.
पंजाबकडे कर्णधार जॉर्ज बेली, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर असे नावाजलेले फलंदाज असले तरी एकालाही अजूनपर्यंत सूर गवसलेला नाही. ऑस्ट्रेलियाची वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका होणार असल्याने शॉन मार्श आणि मिचेल जॉन्सन हे संघासाठी उपलब्ध होऊ शकणार नाहीत.
सामन्याची वेळ : रात्री ८.०० वा. पासून. थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स आणि सोनी पिक्स वाहिनीवर.

Story img Loader