आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अवघे दोन साखळी सामने शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर प्लेऑफच्या सामन्यांचा थरार रंगणार आहे. दरम्यान आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होईल. हा सामना अनेक अर्थाने विशेष आहे. बंगळुरु संघाचे भवितव्य आजच्या सामन्यावरच अवलंबून आहे. याच कारणामुळे बंगळुरु संघाने मुंबईला एक खास पत्रं लिहिलं आहे.
हेही वाचा >>> चेन्नईविरोधात खेळताना चहलने मोडला हरभजन सिंगचा विक्रम, केली ‘ही’ मोठी कामगिरी
बंगळुरु संघ मुंबईवर अवलंबून
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांनी यापूर्वीच प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे. या दोन संघांमध्ये क्वॉलिफायर १ सामना होईल. तर लखनऊ सुपर जायंट्स संघानेही प्लेऑफच्या शर्यतीत तिसरे स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे चौथ्या जागेसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात स्पर्धा आहे. आजच्या सामन्यानंतरच कोण प्लेऑफमध्ये जाणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या सामन्याला अनेक अर्थांनी महत्त्व आले आहे.
हेही वाचा >>> IPL 2022, MI vs DC : आज दिल्ली कॅपिटल्सला विजय अनिवार्य, मुंबईशी करणार दोन हात; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन
बंगळुरु संघाचा मुंबईला सपोर्ट
आजच्या लढतीत दिल्लीचा पराभव किंवा विजयावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे भवितव्य अवलंबून आहे. आज दिल्ली कॅपिटल्सचा विजय झाला तर बंगळुरु संघ शर्यतीतूत बाद होईल. विजयानंतर दिल्ली संघ बंगळुरु संघाशी बरोबरी साधेल. मात्र रनरेट जास्त असल्यामुळे दिल्ली संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळेल तर बंगळुरु संघाचे आव्हान संपुष्टात येईल. तसेच आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजय झाला तर दिल्ली संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होईल आणि बंगळुरु संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळेल.
हेही वाचा >>> शेवटी करुन दाखवलं! चेन्नईला पराभूत करुन राजस्थानचा थेट क्वॉलिफायर १ मध्ये प्रवेश
याच कारणामुळे बंगळुरु संघ मुंबई इंडियन्स संघाला पूर्णपणे पाठिंबा देताना दिसतोय. विशेष म्हणजे आजच्या एका दिवसासाठी बंगळुरु संघाने आपला रंगदेखील बदलला आहे. रेड टर्न्स ब्लू असे म्हणत बंगळुरु संघ मुंबईच्या विजयासाठी प्रार्थना करताना दिसतोय. बंगळुरुचा कर्णधार फॅफ डू प्लेसिस आणि माजी कर्णधार विराट कोहली यांनी आपण मुंबईच्या बाजूने असल्याचे याआधीच म्हटले आहे. आज बंगळुरु संघाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पत्र पोस्ट केलं आहे. हे पत्र बंगळुरुने मुंबई इंडियन्स या संघाला लिहिलं असून आमचा मुंबईला पाठिंबा आहे, असं त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा >>> ४, ४, ६, ४… मोईन अली तळपला! चेन्नईच्या शेवटच्या सामन्यात केली धडाकेबाज खेळी
दरम्यान आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली संघाने पूर्ण तयारी केली असून दोन्ही संघ पूर्ण ताकतीने मैदानावर उतरणार आहेत.