पदार्पणवीर हैदराबाद सनरायजर्सचा शुक्रवारी तेजोमय सूर्योदय झाला. त्या तेजाने आयपीएलविश्वातले सारेच संघ दिपून गेले. पण आता त्यांच्या कर्तृत्वाची खरी कसोटी लागणार आहे. कारण रविवारी त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे तो आयपीएलजगताचा अनभिषिक्त सम्राट ख्रिस गेल आणि त्याचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ. आयपीएलच्या सहाव्या पर्वात विजयी सलामी नोंदवल्यामुळे दोन्ही संघांच्या आशा उंचावल्या आहेत.
नव्या नावानिशी आयपीएलच्या व्यासपीठावर अवतरणाऱ्या हैदराबादने शुक्रवारी रात्री पुणे वॉरियर्सचा २२ धावांनी पराभव केला. त्यामुळे ते उत्साहात आहेत. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुरुवारी रात्री बलाढय़ मुंबई इंडियन्सचा रंगतदार सामन्यात फक्त २ धावांनी पराभव केला. गेल नावाचे वादळ एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर घोंगावताना क्रिकेटरसिकांनी पाहिले.
पुनर्बाधणी करण्यात आलेल्या हैदराबादच्या संघाला दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज होण्यापूर्वी अनेक प्रश्न सोडवावे लागणार आहेत. त्यांच्या फलंदाजीच्या फळीबाबत हे प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होत आहेत. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात वेगवान कसोटी शतक साकारणारा शिखर धवन आणि जे. पी. डय़ुमिनी अद्याप दुखापतीतून सावरले नसल्यामुळे हैदराबादची फलंदाजीची फळी मैदानावर तीव्रतेने जाणवली नाही. कर्णधार कुमार संगकारा, पार्थिव पटेल, कॅमेरून व्हाइट आणि थिसारा परेरा यांनी फलंदाजीची चांगली सुरुवात केली, पण ते मोठय़ा धावसंख्येत त्याचे रूपांतर करू शकले नाही. परंतु रविवारच्या सामन्याकडे पाहताना हैदराबादला सर्वात प्रथम ख्रिस गेलचा विचार करावा लागेल. कोणत्याही गोलंदाजीच्या माऱ्याची कत्तल करण्याची क्षमता गेलकडे आहे. त्यामुळे हैदराबादच्या फलंदाजांना अधिक क्षमतेने फलंदाजी करावी लागणार आहे.
फलंदाजी जरी हैदराबादची बाजू कच्ची असली तरी त्यांची गोलंदाजीची फळी समर्थ आहे. जागतिक क्रिकेटमधील अव्वल गोलंदाज डेल स्टेन त्यांच्या दिमतीला आहे. याशिवाय इशांत शर्मा, थिसारा परेरा आणि लेग-स्पिनर अमित मिश्रा त्यांच्याकडे आहे. मिश्राने १९ धावांत ३ बळी घेत शुक्रवारी सामनावीर पुरस्कार पटकावला. बंगळुरूचे पारडे या लढतीत जड आहे. गेल, कर्णधार विराट कोहली, तिलकरत्ने दिलशान, डॅनियल ख्रिस्टियन आणि ए बी डी’व्हिलियर्ससह बंगळुरूची फलंदाजीची फळी अतिशय ताकदवान आहे. गुरुवारी गेलने ५८ चेंडूंत ९२ धावांची झंझावाती खेळी साकारल्यामुळे बंगळुरूला मुंबई इंडियन्सविरुद्ध आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. पण गेलवर अपेक्षेपेक्षा जास्त विसंबून राहण्याचे परिणामही त्यांनी भोगले आहेत. कोहली, दिलशान आणि डी’व्हिलियर्स यांनाही फलंदाजीचे काही ओझे पेलायला हवे. पहिल्या सामन्यात गेलच्या पायाला दुखापत झाली असली तरी तो रविवारच्या सामन्यात खेळेल अशी अपेक्षा आहे.
झहीर खानच्या दुखापतीची बंगळुरूला चिंता आहे, पण आर. विनय कुमारने पहिल्या सामन्यात लाजवाब गोलंदाजीचे प्रदर्शन केले. याशिवाय वेगवान गोलंदाज रवी रामपॉल, महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन, डॅनियल व्हेटोरी आणि मुरली कार्तिक यांच्यावर गोलंदाजीची मदार असेल.

Story img Loader