Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore IPL Match Updates: रविवारी (दि. २३ एप्रिल) आयपीएल २०२३ मध्ये डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) सामने खेळवले जाणार आहेत. त्यातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा सात धावांनी पराभव करत आपणच खरे रॉयल हे चाहत्यांना ठासून सांगितले. या सामन्यात पुन्हा एकदा आरसीबीचे नेतृत्व विराट कोहली करताना दिसला. दोन वर्षांपूर्वीच कर्णधार म्हणून आपली भूमिका संपवलेल्या विराटला या हंगामात सलग दुसऱ्यांदा चाहते नेतृत्व करताना पाहत आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली या हंगामातील दुसरा विजय आहे.
आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा सात धावांनी पराभव केला आहे. यासह, संघाने यंदाच्या हंगामात चौथे स्थान मिळवले असून आठ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थानची बरोबरी केली आहे. मात्र, उत्तम निव्वळ धावगतीच्या आधारावर राजस्थानचा संघ अव्वल स्थानावर आहे. बंगळुरूने ठेवलेल्या १९० धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात राजस्थानचा ओपनर जॉस बटलरचा त्रिफळा उडवला. पण, यशस्वी जैस्वाल व देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून आरसीबीवर दडपण निर्माण करण्यात यश मिळवले. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ सहा गडी गमावून केवळ १८२ धावा करू शकला. देवदत्त पडिक्कलने ५२ आणि यशस्वी जैस्वालने ४७ धावा केल्या. शेवटी ध्रुव जुरेलने १६ चेंडूत ३४ धावांची खेळी खेळली, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आरसीबीकडून हर्षल पटेलने तीन बळी घेतले.
तत्पूर्वी, राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रेंट बोल्टने त्याची परंपरा कायम राखताना पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीला पायचीत केले. बोल्टची आयपीएलमधील ही शंभरावी विकेट ठरली. संदीप शर्माच्या दुसऱ्या षटकात आरसीबीने १० धावा केल्या. पण, तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बोल्टने आणखी एक धक्का दिला. शाहबाज अहमद २ धावा करून झेलबाद झाला अन् आरसीबीला १२ धावांवर दुसरा धक्का बसला.
फॅफ व मॅक्सवेल जोडीने राजस्थानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी तिसऱ्याविकेटसाठी १२६ धावांची भागीदारी केली. या दोघांमुळे बंगळुरूने सामन्यात चांगलेच पुनरागमन केले होते, परंतु हे दोघं मागोमाग तंबूत परतले अन् बंगळुरूच्या अन्य फलंदाजांनी मोठी भागीदारी करता आली नाही. दोनशेचा आकडा पार करणारी धावसंख्या राजस्थानच्या गोलंदाजांनी कसून आणि अचूक टप्पा राखत त्यांना त्याच्या आत रोखले. राजस्थानकडून संदीप शर्मा आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी अश्विन आणि चहलला प्रत्येकी एक विकेट मिळाली.