छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना जोस बटलरच्या खणखणीत अर्धशतकाच्या बळावर गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ८ विकेट्स राखून नमवलं.
IPL 2025, Royal Challengers Bengaluru vs Gujrat Titans Highlights
आयपीएल २०२५ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स लाईव्ह मॅच अपडेट्स
बटलरचा दणका; गुजरातचा सफाईदार विजय
छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना जोस बटलरच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर गुजरातने ८ विकेट्स आणि १२ चेंडू राखून दमदार विजय मिळवला.
बटलरचा दणका
जोस बटलरने लायम लिव्हिंगस्टोनच्या षटकात १२ धावा चोपून काढल्या. धावगतीचं आव्हान आवाक्यापलीकडे जाणार नाही याची काळजी घेत फटकेबाजी केली.
नवा चेंडू बंगळुरूला फळला; सुदर्शन बाद
आयपीएलच्या नव्या नियमानुसार, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला चेंडू बदलण्याची मुभा मिळते. जोस बटलर आणि साई सुदर्शन यांच्या भागीदारीने निरुत्तर झालेल्या बंगळुरूने नवा चेंडू घेतला. हेझलवूडने सुदर्शनला बाद करत ही जोडी फोडली. सुदर्शनचं अर्धशतक एका धावेनं हुकलं.
बटलर-सुदर्शन जोडी जमली रे
जोस बटलर आणि साई सुदर्शन यांनी चौकार-षटकारांची लयलूट करत गुजरातच्या विजयाचा पाया रचला.
भुवनेश्वर कुमारने गिलला केलं बाद
अनुभवी भुवनेश्वर कुमारने गुजरातचा कर्णधार शुबमन गिलला बाद करत पहिलं यश मिळवून दिलं. त्याने १४ धावा केल्या.
गुजरातची सावध सुरुवात
भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड या अनुभवी गोलंदाजांसमोर खेळताना गुजरातच्या शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी सावध सुरुवात केली आहे.
लायम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्माच्या खेळीमुळे बंगळुरूने गुजरातसमोर ठेवलं १७० धावांचं लक्ष्य
गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूला १६९ धावात रोखत गुजरातच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. लायम लिव्हिंगस्टोनने ५५ धावांची खेळी साकारली.
अनुभवी इशांत शर्माचा बंगळुरूला दणका; कर्णधार माघारी
टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने पहिल्याच षटकात बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारला पायचीत केलं. इशांतच्या पहिल्या चेंडूवर रजतने शानदार चौकार लगावला होता. मात्र पुढच्याच चेंडूवर इशांतने रजतला माघारी धाडलं.
पॉवरप्लेमध्ये गुजरातचा वरचष्मा
टॉस जिंकून गोलंदाजी घेतलेल्या गुजरात टायटन्स संघाने पॉवरप्लेच्या ६ षटकात बंगळुरूच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं.
जीवदानाचा फायदा उठवण्यात सॉल्ट अपयशी; सिराज सुसाट
जोस बटलरने सोपा झेल टाकून जीवदान दिल्यानंतरही आक्रमक फलंदाज फिल सॉल्टला मोठी खेळी करता आली नाही. डाऊन द ट्रॅक येत षटकार खेचायचा प्रयत्न पूर्णत: फसला. सॉल्ट त्रिफळाचीत झाला. त्याने १४ धावा केल्या.
देवदत्त पड्डीकल त्रिफळाचीत
अनेक वर्ष आरसीबी संघाचा प्रमुख गोलंदाज असलेल्या मोहम्मद सिराजने नव्या संघाकडून खेळताना देवदत्त पड्डीकलला बाद केलं.
विराट कोहली तंबूत; अर्शद खानची शानदार गोलंदाजी
डावखुरा युवा वेगवान गोलंदाज अर्शद खानने आरसीबाचा आधारस्तंभ विराट कोहलीला बाद केलं. लेगस्टंपवरचा चेंडू फ्लिक करण्याचा कोहलीचा प्रयत्न फाईनलेगला प्रसिध कृष्णाच्या हातात जाऊन विसावला.
फिल सॉल्टला जीवदान
मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर डाऊन द ट्रॅक येत फिल सॉल्टने फटका खेळला. चेंडू विकेटकीपर जोस बटलरच्या दिशेने उडाला. बटलर झेल टिपणार असं वाटत असतानाच चेंडू त्याच्या ग्लोव्ह्जमधून बाहेर पडला. सॉल्टला जीवदान देणं गुजरातला महागात पडू शकतं.
गुजरातच्या संघात दोनच विदेशी खेळाडू
आयपीएल नियमानुसार, प्रत्येक संघाला अंतिम अकरात केवळ चारच विदेशी खेळाडू खेळवता येतात. हा गुजरातने टॉसवेळी जाहीर केलेल्या अंतिम अकरात केवळ दोनच विदेशी खेळाडू आहेत. रशीद खान आणि जोस बटलर हे गुजरातचे विदेशी खेळाडू आहेत. इम्पॅक्ट प्लेयरच्या यादीत शेरफन रुदरफोर्ड आणि ग्लेन फिलीप्स यांचा समावेश आहे. दोनच विदेशी खेळाडू असल्याने हे दोघेही अंतिम अकरात खेळू शकतात.
गुजरातने टॉस जिंकला; गोलंदाजीचा निर्णय
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने बंगळुरूविरुद्धच्या लढतीत नाणेफेकीचा कौल जिंकला. गिलने प्रथम गोलंदाजी करणार असल्याचं स्पष्ट केलं. वैयक्तिक कारणांमुळे कागिसो रबाडा अंतिम अकरात नाहीये. त्याच्याऐवजी अर्शद खानला संघात समाविष्ट केलं आहे.
आरसीबी घरच्या मैदानावर पहिल्यांदाच खेळणार
यंदाच्या हंगामाची दिमाखात सुरुवात करणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने संघ पहिल्यांदाच घरच्या मैदानावर खेळणार आहे. त्याचवेळी गुजरात टायटन्सचा संघ पहिल्यांदाच अवे म्हणजेच प्रतिस्पर्ध्यांच्या बालेकिल्ल्यात खेळायला उतरणार आहे.
नवा कर्णधार, नवा हंगाम
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नेतृत्वाची धुरा रजत पाटीदारकडे सोपवली. विराट कोहली हा संघाचा आधारवड आहे. यांच्या जोडीला लायम लिव्हिंगस्टोन आणि फिल सॉल्ट या धडाकेबाज फलंदाजांना बंगळुरूने ताफ्यात सामील केलं आहे. टीम डेव्हिड आणि जितेश शर्मा फिनिशरच्या भूमिकेत असतील. कृणाल पंड्या संघाच्या संतुलनादृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार ही अनुभवी वेगवान गोलंदाजांची जोडी बंगळुरूची ताकद आहे. बंगळुरूने यश दयाळ या युवा गोलंदाजावर विश्वास ठेवला आहे .
गिलच्या नेतृत्वात नव्या संघांची बांधणी
गुजरात टायटन्सने रिटेन्शनमध्ये अपेक्षित अशा पाच खेळाडूंना रिटेन केलं. यामध्ये संघाचा कर्णधार शुबमन गिल, रशीद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया आणि शाहरुख खान या खेळाडूंचा समावेश आहे. संघाने रशीदला सर्वाधिक १८ कोटी आणि त्यानंतर गिलला १६.५० कोटीत रिटेन केलं. त्यानंतर युवा फलंदाज साई सुदर्शनला ८.५० कोटी आणि राहुल तेवतिया आणि शाहरुख खान यांना प्रत्येकी चार कोटी देत संघात कायम ठेवलं.
अभ्यासू विचारी संघ
व्यवस्थित अभ्यास करुन लिलावात उतरणारा संघ ही ओळख गुजरातने या लिलावातही कायम राखली. सामने आणि जेतेपद पटकावयचं असेल तर गोलंदाजांची मजबूत फळी असायला हवी यावर प्रशिक्षक आशिष नेहरा यांचा भर असतो. याचाच भाग म्हणून त्यांनी मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा यांना संघात घेतलं. या दोघांसाठी गुजरातला मोठी रक्कम मोजावी लागली. महिपाल लोमरुर, कुमार कुशाग्र, निशांत सिंधू, अनुज रावत आणि मानव सुतार या युवा खेळाडूंचा संचच गुजरातने खरेदी केली.
जोस बटलर आणि कागिसो रबाडाच्या समावेशाने संघाला बळकटी
आयपीएलमधील पदार्पणाच्या हंगामातच जेतेपद पटकावणारा संघ म्हणून गुजरात टायटन्सने आपली ओळख तयार केली आहे. पाच खेळाडूंना रिटेन करणाऱ्या गुजरातने लिलावात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर यांना ताफ्यात समाविष्ट केलं.
झहीर खान म्हणतो, सामना आमचा क्युरेटर पंजाबचा
‘मंगळवारी आमच्यासाठी घरच्या मैदानावरचा सामना होता. बहुतांश संघ होम अॅडव्हांटेज घेण्याचा प्रयत्न करतो. पण खेळपट्टी पाहून क्युरेटर लखनौ संघाचा विचार करत आहेत असं वाटलं नाही. पंजाबचा क्युरेटर असल्यासारखं तुम्हाला वाटेल’, अशा परखड शब्दात झहीर खान यांनी टीका केली आहे. आयपीएल स्पर्धेत खेळपट्टीवरून वादाला तोंड फुटलं आहे. मंगळवारी लखनौ आणि पंजाब यांच्यातील लढतीनंतर लखनौचे प्रशिक्षक झहीर खान यांनी खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पंजाबने या लढतीत ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.
गुजरातची अडखळत सुरुवात
गुजरातला सलामीच्या लढतीत पंजाब किंग्जविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. २४४ धावांचा पाठलाग करताना त्यांनी २३२ धावा करत चांगली टक्कर दिली.
नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या लढतीत गुजरातने बलाढ्य मुंबईला हरवलं आहे.
बंगळुरुची दमदार आगेकूच
रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने यंदा चांगली सुरुवात केली आहे. तब्बल १७ वर्षानंतर त्यांनी चेन्नई सुपर किंग्स संघाला त्यांच्या बालेकिल्ल्यात नमवलं.
सलामीच्या लढतीत त्यांनी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला नमवण्याची किमया केली होती.