सहा सामन्यांमध्ये पाच विजयांसह राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले असून कामगिरीत सातत्य राखता न आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी त्यांना दोन हात करावे लागणार आहेत.
राजस्थानने दहा गुणवत मिळवत आतापर्यंत स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी केली आहे. सहाव्या सामन्यातही त्यांना किंग्ज इलेव्हन पंजाबकडून ‘सुपर ओव्हर’मध्ये पराभव पत्करावा लागला होता. अजिंक्य रहाणे हा भन्नाट फॉर्मात आहे. आतापर्यंत प्रत्येक सामन्यामध्ये त्याने जवळपास पन्नासच्या सरासरीने धावा केल्या आहेत. शेन वॉटसनही चांगली फलंदाज करत आहे, पण स्टीव्हन स्मिथला अजूनही सूर गवसलेला नाही. जेम्स फॉल्कनरलाही फलंदाजीमध्ये छाप पाडता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये मुंबईकर प्रवीण तांबे आणि धवल कुलकर्णी सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. राजस्थानकडे सर्वात जास्त अष्टपैलू खेळाडू असले तरी त्यांना अजूनपर्यंत सूर गवसलेला नाही.
बंगळुरूच्या खेळाडूंची आतापर्यंत भट्टी जमलेली दिसत नाही. ख्रिस गेल आणि ए बी डी’व्हिलियर्स यांना अजूनपर्यंत मोठी खेळी साकारता आलेली नाही. कर्णधार विराट कोहलीलाही एकहाती सामना जिंकवून देता आलेला नाही. गोलंदाजीमध्ये एकाही खेळाडूला भेदक मारा करता आलेला नाही.
दोन्ही संघांचा विचार केला तर बंगळुरूपेक्षा राजस्थानचेच पारडे जड आहे; पण बंगळुरूकडे एकहाती सामना फिरवणारे खेळाडू असल्याने राजस्थानला गाफील राहून चालणार नाही.

प्रतिस्पर्धी संघ
राजस्थान रॉयल्स :  शेन वॉटसन (कर्णधार), अंकित शर्मा, ब्रेनडर स्रान, रजत भाटिया, स्टुअर्ट बिन्नी, बेन कटिंग, जेम्स फॉल्कनर, दीपक हुडा, धवल कुलकर्णी, विक्रमजीत मलिक, ख्रिस मॉरिस, करुण नायर, अभिषेक नायर, अजिंक्य रहाणे, प्रदीप साहू, दिनेश साळुंखे, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, टिम साऊदी, प्रवीण तांबे, राहुल टेवाटिया, रस्टी थेरॉन, सागर त्रिवेदी, दिशांत याग्निक.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :  विराट कोहली (कर्णधार), ख्रिस गेल, ए बी डी’व्हिलियर्स, वरुण आरोन, सीन अबॉट, अबू नेचिम, सुब्रमण्यम बद्रिनाथ, शिशिर बावणे, मनविंदर बिस्ला, युझवेंद्र चहल, अशोक दिंडा, इक्बाल अब्दुल्ला, दिनेश कार्तिक, सर्फराझ खान, निक मॅडिसन, मनदीप सिंग, अ‍ॅडम मिलने, हर्षल पटेल, रिले रोसू, डॅरेन सॅमी, संदीप वॉरियर, जलाज सक्सेना, मिचेल स्टार्क, योगेश ताकवले, डेव्हिड वाइज, विजय झोल.

वेळ : रात्री ८.०० वा.पासून
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स वाहिनीवर.