आयपीएल २०२२ स्पर्धा रंगतदार वळणावर आली असून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघांची धडपड सुरु आहे. मुंबई आणि चेन्नई सुपर किंग या संघांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायन्ट्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ टॉप चारमध्ये आहेत. तर दिल्ली, हैदराबाद, पंजाब आणि कोलकाता संघात चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यातील विजय आणि पराभव स्पर्धेतील गणितं बदलणार आहे. रविवारी बंगळुरुचा सामना हैदराबादशी आहे. या सामन्यात बंगळुरुचा संघ हिरव्या जर्सीत दिसणार आहे. बंगळुरुचा संघ २०११ पासून एका सामन्यात हिरव्या रंगाची जर्सी परिधान करते. पण गेल्या वर्षी असं करता आलं नाही. मात्र यंदा ही परंपरा पुन्हा सुरु होणार आहे. नुकतंच बंगळुरुच्या नव्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं आहे.

हिरव्या जर्सीच्या माध्यमातून बंगळुरुचा संघ जगाला पर्यावरणाचा संदेश देणार आहे. पर्यावरण सुरक्षित असेल तर आपण सर्व सुरक्षित राहू. पर्यावरणाकडे दुर्लक्ष केले, तर अशी वेळ येईल की, पिण्यासाठी पाणी नाही, श्वास घेण्यासाठी शुद्ध हवाही राहणार नाही. अशा परिस्थितीत आनंदी जीवनाची कल्पना करणे निरर्थक ठरेल. कोणत्याही किमतीत पर्यावरणाचे रक्षण केलं पाहिजे, असा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.

फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील बंगळुरू संघाने स्पर्धेत हिरवी जर्सी परिधान करण्यासाठी दोन हॅशटॅग चालवले आहेत. फ्रँचायझी सोशल मीडियावर #GoGreen आणि #ForPlanetEarth हॅशटॅग वापरत आहे. रविवारी हैदराबादविरुद्ध दुपारी ३.३० वाजता संघ मैदानात उतरेल. यावेळी सर्व खेळाडू हिरव्या जर्सीत दिसणार आहेत. बंगळुरुने ११ पैकी ६ सामने जिंकले असून आता संघाच्या नजरा प्लेऑफसाठी पात्र ठरण्यावर असतील.