RCB Poor Performance at Rajiv Gandhi Stadium: आयपीएल २०२३ मध्ये आज एक अतिशय महत्त्वाचा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात आरसीबीसाठी ‘करो या मरो’ची स्थिती असणार आहे. कारण हा सामना आरसीबीने गमावला, तर त्यांना प्लेऑफसाठी इत संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. त्यामुळे आरसीबीला आजचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. हा सामना राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणारा आहे, जिथे आरसीबीची कामगिरी खराब राहिली आहे.
राजीव गांधी स्टेडियमवर आरसीबीचा रेकॉर्ड खूपच खराब –
राजीव गांधी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. त्यांच्या संघाने या स्टेडियममध्ये आतापर्यंत एकूण सात सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना केवळ एकच सामना जिंकता आला आहे. तसेच ६ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
त्याच वेळी, २०१३ पासून या स्टेडियममध्ये त्यांनी सनरायझर्सविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही. अशा परिस्थितीत आरसीबीसाठी या मैदानावर विजय मिळवणे सोपे नसेल. जर आरसीबीला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या मधल्या फळीसह त्यांच्या टॉप ऑर्डरसाठी धावणे खूप महत्वाचे आहे. कारण यंदा त्यांच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी बरीच निराशा केली आहे.
आरसीबीचा पराभव झाला तर कसे असेल समीकरण?
जर आज आरसीबीचा संघ सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना हरला तर चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. तसेच, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जसह आरसीबी यांच्यात अत्यंत निकराची लढत होणार आहे. कारण या सामन्यानंतर प्लेऑफमध्ये जाण्यासाठी फक्त एकच जागा उरणार असून त्यासाठी पाच संघात स्पर्धा लागेल.
तसेच, जर मुंबईने आपला पुढील सामना गमावला आणि या संघांनी त्यांचे उर्वरित प्रत्येक सामने जिंकले, तर नेट रनरेटच्या आधारे, या पाच संघांपैकी फक्त एकच संघ पुढील फेरीसाठी म्हणजेच प्लेऑफसाठी पात्र ठरू शकेल. मात्र. आरसीबीला अजूनही चांगली संधी आहे. कारण त्यांच्या संघाचा नेट रनरेट या संघांपेक्षा खूपच चांगला आहे.