जॉस बटलरने (Jos Buttler) आयपीएलच्या (IPL) या हंगामात तिसरं शतक झळकावलं आहे. इंग्लंडचा यष्टीरक्षक असलेल्या बटलरने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तडाखेबाज शतक केलं आणि दिल्लीच्या पराभवात मोठी भूमिका निभावली. यासह जॉस बटलर आता विराट कोहलीच्या एका विक्रमापासून केवळ एक पाऊल दूर आहे. हा विक्रम आहे आयपीएलच्या कोणत्याही एका हंगामात केलेल्या सर्वाधिक शतकांचा.
जॉस बटरलने आतापर्यंत तीन शतकं झळकावली आहेत. दुसरीकडे विराट कोहलीने एका हंगामात चार शतकं करत या विक्रमात पहिला क्रमांक पटकावला आहे. मात्र, बटलर सध्या शानधार फॉर्ममध्ये आहे. त्याने या हंगामाच्या अर्ध्या भागातच ३ शतकं झळकावली आहेत. त्यामुळे उर्वरित आयपीएल हंगामात बटलर विराटचा विक्रम मोडून नवा विक्रम करण्याची शक्यता आहे. सध्या बटलर शतक बनवणाऱ्यांच्या यादीत विराटनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
विराट कोहलीने याआधी एका आयपीएल हंगामात चार शतकं केली होती. आता बटलरला विराटच्या या विक्रमाची बरोबरी करण्यासोबतच स्वतःचा नवा विक्रम निर्माण करण्याचीही संधी असेल.
राजस्थान रॉयल्सची इनिंग
राजस्थानकडून जॉस बटलरने ६५ चेंडूत ११६ धावा केल्या. यात ९ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश आहे. राजस्थानला पहिला धक्का देवदत्तच्या रुपात भेटला. त्याने ३५ चेंडूत ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. देवदत्तने २ षटकार आणि ७ चौकार लगावले. बटलर शतकी खेळी करून बाद झाल्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने दमदार खेळी केली. सॅमसनने १९ चेंडूत नाबाद ४६ धावा केल्या. यात ३ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश आहे. शिमरोन हेटमायरने १ चेंडूत नाबाद १ धाव काढली.
दिल्ली कॅपिटल्सची इनिंग
दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी शॉने २७ चेंडूत ३७ धावा केल्या. यात ५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. डेविड वॉर्नरने १४ चेंडूत २८ धावा केल्या. यात त्याच्या ५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. सरफराज खानला ३ चेंडूत केवळ १ धाव काढता आली. ऋषभ पंतने ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २४ चेंडूत ४४ धावा केल्या. ललित यादवने २४ चेंडूत ३७ धावा केल्या. यात त्याच्या ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.
अक्षर पटेल स्वस्तात माघारी गेला. त्याने ४ चेंडूत केवळ एक धाव काढली. रोवमॅन पॉवेलने १५ चेंडूत ३६ धावांची दमदार खेळी केली. यात त्याने ५ षटकार मारले. विशेष म्हणजे शेवटच्या षटकात ६ चेंडूत ३६ धावांची गरज असताना पॉवेलने ३ चेंडूत ३ षटकार मारले. मात्र, खेळात खंड आला आणि त्यानंतर हा फॉर्म तुटला. पॉवेल ३६ धावा करून बाद झाला.
शार्दुल ठाकूरने ७ चेंडूत नाबाद १० धावा केल्या. कुलदीप यादवही नाबाद राहिला. दिल्लीला राजस्थानने दिलेल्या २२३ धावसंख्येचा पाठलाग करताना २० षटकात ८ बाद २०७ धावाच करता आल्या. यासह राजस्थानने दिल्लीला १५ धावांनी पराभूत केलं.
हेही वाचा : IPL 2022 DC vs RR Updates : राजस्थानकडून दिल्लीचा पराभव, १५ धावांनी विजय
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन
पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, सरफराज खान, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), ललित यादव, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मुस्तफिजुर रहमान, कुलदीप यादव, खलील अहमद
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन
जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), शिमरोन हेटमायर, रियान पराग, करुण नायर, रविचंद्रन अश्विन, ओबेद मॅककॉय, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल