पीटीआय, नवी दिल्ली
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामात चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) परवानगी दिली आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर, लाळेच्या वापरावर घालण्यात आलेले निर्बंध उठविणारी ‘आयपीएल’ ही क्रिकेटविश्वातील पहिलीच स्पर्धा ठरणार आहे.
‘आयपीएल’च्या आगामी हंगामाला शनिवारपासून (२२ मार्च) सुरुवात होणार असून त्याआधी दहाही संघांच्या कर्णधारांची गुरुवारी मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत कर्णधारांनी ‘बीसीसीआय’च्या प्रस्तावास मान्यता दिली.
‘‘चेंडूवर लाळेचा वापर करण्यास घालण्यात आलेली बंदी आता उठविण्यात आली आहे. ‘आयपीएल’मधील काही कर्णधार या निर्णयाच्या पक्षात नव्हते, तर काही साशंक होते. मात्र, बहुतांश कर्णधारांनी या प्रस्तावास पाठिंबा दर्शविल्याने आता चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करता येणार आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याने सांगितले.
चेंडूला लकाकी आणण्यासाठी पूर्वीपासून लाळेचा वापर करण्यात येत होता. मात्र, करोनाकाळात आरोग्यविषयक खबरदारी म्हणून चेंडूवर लाळेचा वापर करण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. पुढे २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) हा निर्णय कायम ठेवला. या पार्श्वभूमीवर, ‘बीसीसीआय’नेही ‘आयपीएल’साठी असाच नियम केला होता.
‘आयपीएल’मधील सर्व संघांच्या कर्णधारांची मुंबई येथील ‘बीसीसीआय’च्या मुख्यालयात गुरुवारी बैठक झाली. ही बैठक दुपारी १२.३० वाजता नियोजित होती. मात्र, काही संघांच्या अधिकाऱ्यांना येण्यास विलंब झाल्याने बैठक उशिराने सुरू झाली. या बैठकीत आगामी हंगामाच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. लाळेवरील बंदी उठविण्याचा प्रस्ताव ‘बीसीसीआय’कडून ठेवण्यात आला आणि त्याला बहुतांश कर्णधारांनी पाठिंबा दर्शविला. आता ‘बीसीसीआय’च्या या निर्णयामुळे ‘आयसीसी’लाही आपल्या नियमाबाबत पुनर्विचार करावा लागू शकतो.
काही दिवसांपूर्वीच झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेदरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने लाळेच्या वापरावर असलेल्या बंदीबाबत नाराजी व्यक्त केली होती. ‘‘चेंडू रिव्हर्स स्विंग करायचा झाल्यास लाळेचा वापर खूप महत्त्वाचा ठरतो. त्यानेच चेंडूला लकाकी आणता येते. गोलंदाजाला मदत असल्याच खेळाची मजाही वाढते,’’ असे शमी म्हणाला होता. त्याला व्हरनॉन फिलँडर आणि टीम साऊदी यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर या मागणीने जोर धरला आणि ‘बीसीसीआय’ने गोलंदाजांचे मत विचारात घेऊन मोठा निर्णय घेतला.
चेंडू रिव्हर्स स्विंग होण्यास मदत – सिराज
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने गुरुवारी ‘आयपीएल’च्या आगामी हंगामात लाळेचा वापर करण्यास परवानगी देण्याच्या ‘बीसीसीआय’च्या निर्णयाचे स्वागत केले. यामुळे गोलंदाजांना चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यास मदत मिळेल, असे सिराजला वाटते. ‘‘ ही गोलंदाजांसाठी आनंदाची बातमी आहे. जेव्हा चेंडूमधून कुठल्याही पद्धतीची मदत मिळत नाही, तेव्हा लाळेचा वापर करून चेंडू रिव्हर्स स्विंग होण्याची शक्यता वाढते. लाळेचा वापर केल्याने चेंडूच्या एका पृष्ठभागाला चकाकी आणण्यासाठी मदत मिळते. हे स्विव्हर्स स्विंगकरिता गरजेचे असते,’’ असे सिराजने सांगितले.
‘इम्पॅक्ट प्लेयर’बाबतही चर्चा
●कर्णधारांच्या बैठकीत ‘आयपीएल’मध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रभावी खेळाडू अर्थात ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाबाबतही चर्चा करण्यात आली.
●या नियमाबाबत रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, हा नियम २०२७ पर्यंत कायम राहणार असल्याचे ‘बीसीसीआय’ने आधीच स्पष्ट केले आहे.
●‘‘काहींनी प्रभावी खेळाडूच्या नियमावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, याचा युवा फलंदाज आणि गोलंदाजांना फायदा झाला आहे. या नियमाविना त्यांना खेळण्याची संधी मिळाली नसती,’’ असे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याने सांगितले.
●दरम्यान, चेंडू डोक्यावरुन गेल्यास देण्यात येणारा ‘वाइड’ आणि ऑफ स्टम्पबाहेरील ‘वाइड’साठीही आता ‘रिव्ह्यू’च्या वापरास परवानगी देण्यात आली आहे.
●सामन्यादरमान मैदानावर दव जास्त असल्यास दुसऱ्या डावात ११व्या षटकानंतर नवा चेंडू वापरला जाऊ शकेल. याबाबतचा निर्णय पंच घेतील.
●तसेच तीन सामन्यांत षटकांची गती धिमी राखल्याने कर्णधारावर एका सामन्याची बंदी घालण्याचा नियमही आता मागे घेण्यात आला आहे. त्यांना केवळ दोषांक दिले जातील.