IPL 2025 Ricky Ponting Revealed Yuzvendra Chahal Injury: ‘युझवेंद्र चहलला दुखापतीने सतवलं होतं. त्याने सामन्याआधी फिटनेस टेस्ट दिली. मी त्याला विचारलं की तू नीट आहेस ना? तो म्हणाला, कोच मी तय्यार आहे आणि त्याने करून दाखवलं’, अशा शब्दांत पंजाबचे प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांनी चहलला शाबासकी दिली. स्पर्धेत विकेट्ससाठी झगडणाऱ्या चहलने या सामन्यात ४ विकेट्स पटकावत विजयात निर्णायक भूमिका बजावली. लिलावात पंजाबने चहलसाठी १८ कोटी रुपयांची बोली लावली होती. यावरूनही उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. यावर मी या बोलीचा हकदार आहे असं चहलने म्हटलं होतं. चहलने त्याची पत मंगळवारी दाखवून दिली.
पंजाब किंग्सच्या संघाने केकेआरला विजयासाठी अवघ्या ११२ धावांचं लक्ष्य दिलं होत. हा सामना आता केकेआर जिंकणार असंच अगदी सर्वांनी ठरवलं होतं. पण पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी आणि संपूर्ण संघाने सर्वांना खोटं ठरवलं. या सामन्यात युझवेंद्र चहलने ४ विकेट्स घेत केकेआरच्या फलंदाजीला सुरूंग लावला. पंजाबच्या इतर गोलंदाजांनीही भेदक गोलंदाजी करत केकेआरला ९५ धावांवर सर्वबाद करत १६ धावांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

पॉन्टिंगने सामन्यानंतर बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “माझं हृदय अजूनही वेगाने धडधडतं आहे. माझ्या वयाच्या माणसांसाठी असे सामने फारसे बरे नाहीत. दोन दिवसांपूर्वी आम्ही २४५ धावांचा बचाव करू शकलो नव्हतो. पण हा लो स्कोअरिंग थ्रिलर सामना होता”.

चहलच्या कामगिरीचं त्यांनी मनापासून कौतुक केलं. ते म्हणाले, “चहलची कामगिरी अफलातून होती. सामन्याआधी त्याने फिटनेस टेस्ट दिली. मागच्या सामन्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. म्हणून मी त्याला सामन्याआधी विचारलं की तुझी तब्येत नीट आहे ना? त्याने सांगितलं, कोच मी खेळण्यासाठी तय्यार आहे. त्याची कामगिरी पाहिली तर तो किती तय्यार होता याचा प्रत्यय येतो. आजचा सामना हरलो असतो तरी ज्या पद्धतीने आम्ही संघर्ष केला, झुंजारपणा दाखवला त्याकरता खेळाडूंचा अभिमानच वाटला असता”.

“बॅटिंगमध्ये आम्ही कमी पडलो पण बॉलिंगमध्ये उट्टं भरून काढलं. माझ्या मते पंजाब संघासाठी हंगामातला सर्वोत्तम विजय ठरावा. अटीतटीच्या लढतीत आम्ही थरारक विजय मिळवला आहे. मध्यंतरावेळी आम्ही जिंकू यावर जगभरातल्या क्रिकेटप्रेमींपैकी कोणी विश्वास ठेवला नसता पण आम्ही करून दाखवलं. प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी हा आतापर्यंतचा शानदार विजय आहे”, असं पॉन्टिंग यांनी सांगितलं.

या दिमाखदार विजयाचं सेलिब्रेशन व्हायला हवं असं समालोचकांनी विचारताच पॉन्टिंग यांनी तात्काळ सांगितलं की, ‘नक्कीच सेलिब्रेशन असेल. खेळाडू कदाचित लवकर झोपायला जातील पण मी जाणार नाही. तुम्हीही आमच्यात हॉटेलात आहात, तुम्हालाही पार्टीचं निमंत्रण आहे. धमाकेदार विजयाचा आनंद साजरा करू’.