Rinku Singh Takes Gautam’s Blessings Video Viral : आयपीएल २०२४ चा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने ८ गडी राखून एकतर्फी विजय नोंदवत १० वर्षानंतर तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले. केकेआरच्या विजयात खेळाडूं आणि कोचसह मार्गदर्शक गौतम गंभीरनेही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे गौतम गंभीर कोलकात नाईट रायडर्सचा ‘किंग मेकर’ म्हणले तर वावगे ठरणार नाही. जेतेपदाचा हा सामना जिंकल्यानंतर केकेआरचा युवा स्फोटक फलंदाज रिंकू सिंग गौतम गंभीरसमोर नतमस्तक झाला, ज्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.
रिंकू सिंग गौतम गंभीर पुढे नतमस्तक –
सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केकेआरच्या विजयानंतर रिंकू सिंग मेंटॉर गौतम गंभीरसमोर नतमस्तक होऊन त्याचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. यानंतर आणखी एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये सुनील नरेन आणि गंभीरची जुगलबंदी दिसत आहे. नरेनने गंभीरला मांडीत उचलून सेलिब्रेशन केले आणि यानंतर गंभीरनेही तेच केले. केकेआर संघाचा दीर्घकाळ भाग असलेला आंद्रे रसेल चॅम्पियन बनल्यानंतर थोडा भावूक दिसला. त्याने गौतम गंभीरला मिठी मारली आणि त्यावेळी त्याचे डोळे ओले पाणावलेले पाहायला मिळाले.
कोलकाता नाईट रायडर्सने या हंगामाच्या सुरुवातीपूर्वीच गंभीरला संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले होते आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. संघाने तिसरे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी कोलकाता संघाने २०१२ आणि २०१४ मध्ये गंभीरच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे दोन्ही विजेतेपद पटकावले होते. आता पुन्हा एकदा गंभीरसोबत असताना संघाने इतिहास रचला आहे.
जेतेपदाच्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १८.३ षटकांत सर्वबाद ११३ धावांवर केल्या होत्या. ही आयपीएल इतिहासातील फायनलमधील ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. या सामन्यात हैदराबादचे फलंदाज कोलकाताच्या गोलंदाजांसमोर सपशेल लोटांगण घालताना दिसले. या सामन्यात अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन यांसारख्या बड्या खेळाडूंची बॅट शांत राहिली. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने व्यंकटेश अय्यर आणि गुरबाज अहमद यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे सामना १०.३ षटकांत जिंकला.
हेही वाचा – IPL 2024 Prize Money : जेतेपदानंतर कोलकाता टीम मालामाल, उपविजेत्या हैदराबादवरही पैशांचा पाऊस
रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात कोलकाताने बॉल आणि बॅट दोन्हीसह चमकदार कामगिरी केली. त्याचबरोबर पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला कधीही वरचढ होऊ दिले नाही. कोलकाताने यापूर्वी २०१४ च्या हंगामात पंजाब किंग्जला पराभूत करून शेवटचे विजेतेपद पटकावले होते आणि आता १० वर्षांनंतर संघाने पुन्हा ट्रॉफीवर कब्जा केला आहे. विशेष म्हणजे कोलकाता नाईट राडर्स संघाने चौथ्यांदा आयपीएल फायनलमध्ये धडक देताना तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले.