नवी दिल्ली : ऋषभ पंतसारख्या प्रतिभावान आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूची जागा घेणे अन्य कोणत्याही खेळाडूला शक्य होणार नाही. पंतची उणीव भरून काढण्यासाठी आमच्या मधल्या फळीतील अन्य फलंदाजांना आपला खेळ उंचवावा लागेल, असे वक्तव्य ‘आयपीएल’ संघ दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने केले.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कार अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. त्याचे या वर्षी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन अपेक्षित नाही. त्याच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नर दिल्ली संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. ‘‘पंतची उणीव आम्हाला नक्कीच जाणवेल. अन्य कोणताही खेळाडू पंतची जागा घेऊ शकणार नाही. क्रिकेटच्या तीनही प्रारूपांत तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. आमच्या संघाचे तो कर्णधारपद भूषवतो, शिवाय चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना विजयवीर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे त्याला पर्याय शोधणे अशक्यच आहे,’’ असे पॉन्टिंग म्हणाला.

Story img Loader