IPL 2024, PBKS vs DC Today’s Match Updates: तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर आता दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत आयपीएलच्या मैदानातून पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या एका भीषण अपघातानंतर पंतला अनेक महत्त्वाचे सामने गमवावे लागले होते, इतकंच काय तर आयपीएलमध्ये सहभागी होण्याची शक्यता सुद्धा धूसर होती. पण सगळं वेळीच जुळून आल्याने आज शनिवार पंजाब किंग्स विरुद्ध ऋषभ मैदानात उतरणार आहे. दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि दिल्ली कॅपिटल्सचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक, रिकी पाँटिंग यांनी सुद्धा ऋषभकडून आज थक्क करणारी कामगिरी होऊ शकते अशी शक्यता वर्तवली आहे. ऋषभच्या तयारीविषयी सांगताना पाँटिंग यांनी एक खास किस्सा सुद्धा सांगितलाय.
म्हणून पंतला नेटमधून बाहेर काढावं लागतं..
१७ व्या हंगामातील दुसरा सामना PBKS च्या नवीन होम ग्राउंड मुल्लानपूर येथे खेळवला जाईल. सामन्यापूर्वी, पाँटिंग म्हणाले की, “दुखापतीमुळे गमावलेला सरावाचा वेळ भरून काढण्यासाठी पंत इतका उत्सुक आहे की त्याला कधीकधी चक्क नेटमधून खेचून बाहेर काढावे लागते. इथे येण्यापूर्वी एक आठवडा आम्ही विझागमध्ये प्रशिक्षण सत्र घेतले आणि मी हे ठाम विश्वासाने सांगू इच्छितो की ऋषभ आता परत आला आहे आणि खेळण्यासाठी पूर्ण तयार आहे. फलंदाजीच्या सरावात तो कधी कधी इतका रमतो की आम्हाला त्याला नेटमधून बाहेर काढावे लागते. आता त्याची शैली किती सुधारलीये हे आम्ही पाहत आहोत आणि त्यामुळे पंजाब विरुद्ध सामन्यात काहीतरी कमाल घडलं तर आश्चर्य वाटणार नाही. त्याचं हसू आणि जिद्द हे संघालाही खूप प्रोत्साहन देतंय, प्रत्येकालाच ऋषभसारखं व्हायची इच्छा आहे.”
आज ऋषभ घाबरलेला असेल कारण..
पॉंटिंग यांनी पंतच्या पुनरागमनाबाबत आनंद व्यक्त करताना असेही म्हटले की, “अनेकांच्या मनात ही शंका होती की कदाचित पंत इतक्यात परतणार नाही पण मला कधीच याबाबत संभ्रम नव्हता. मी त्याला जेव्हा मागच्या वर्षीच्या आयपीएलच्या दरम्यान भेटलो तेव्हा त्याला एका कुशीवर फक्त पडून राहायला सांगितलेलं होतं, नंतर आम्ही कोलकाताच्या एका शिबिरात भेटलो होतो. तो हळू हळू चालू लागला, धावू लागला, आणि आता तो कुठे पोहोचलाय हे सगळेच पाहतायत, ही त्याची परतण्याची योग्य वेळ आहे. पंजाब विरुद्ध सामन्यात आज कदाचित पंत घाबरलेला असेल पण हे चांगले लक्षण आहे, यातून हे दिसतं की तुमच्यासाठी एखादी गोष्ट किती महत्त्वाची आहे. उलट ज्या दिवशी तुम्ही अजिबातच चिंता करणार नाही त्यादिवसापासून तुम्ही क्रिकेट खेळलाच नाहीत तर उत्तम.”
दरम्यान, पॉंटिंग असेही म्हणाले की, “यावर्षी आम्हाला एक उत्तम संघ मिळाला आहे, आमची तयारी सुद्धा पूर्ण झाली आहे. आम्ही यंदा फक्त सामन्यांमध्ये अव्वल राहण्याचा प्रयत्न करू, आम्हाला खात्री आहे की प्रत्येक खेळ जिंकण्यासाठी संघ पुरेपूर तयारीने मैदानात उतणार आहे, मी फक्त संघातील प्रत्येकाला इतकेच सांगेन की, कोणतीही चूक करू नका.”