GT vs RR Riyan Parag Controversial Wicket IPL 2025: आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात रियान परागच्या विकेटवर मोठी चर्चा सुरू आहे. या सामन्यातील पंचांचा एक निर्णय वादग्रस्त ठरला. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा फलंदाज रियान परागला बाद देण्यात आल्याने वाद निर्माण झाला. संजू सॅमसन आणि रियान परागने संघाचा डाव सावरला होता, पण ही भागीदारी तुटल्यानंतर संघाने झटपट विकेट गमावले आणि परिणामी ५८ धावांनी पराभव पत्करावा लागला.

राजस्थानच्या डावाच्या सातव्या षटकात रियान परागला बाद देण्यात आले आणि हा वादग्रस्त निर्णय घेण्यात आला. रियान परागला मैदानावरील पंचांनी बाद घोषित केलं आणि रिव्ह्यू घेतल्यानंतरही तिसऱ्या पंचांनी निर्णय बदलला नाही.

९ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करत २१७ धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरादाखल, राजस्थानने आपले दोन विकेट लवकर गमावले. असे असूनही, नवीन फलंदाज म्हणून क्रीजवर आलेल्या रियान परागने येताच हल्लाबोल केला. त्याच्या बॅटमधून काही उत्कृष्ट फटके पाहायला मिळाले, ज्यामुळे राजस्थानची धावसंख्या पुढे सरकत राहिली.

राजस्थान संघाने आपला डाव सावरला होता, पण सातव्या षटकात या मेहनतीवर पाणी फेरलं. सातवं षटक नवा गोलंदाज कुलवंत खेजरोलियाला देण्यात आले. त्याच्या षटकातील चौथा चेंडू जवळजवळ यॉर्कर लेन्थचा होता, जो रियनला थर्ड मॅनच्या दिशेने खेळायचा होता. पण त्याची बॅट खाली येताच चेंडू जवळून गेला आणि यष्टीरक्षकाने झेल टिपला. मैदानावरील पंचांनी त्याला बाद घोषित केलं.

पण रियानने यावर डीआरएसची मदत घेतली. त्याने रिव्ह्यू घेण्यामागचं कारण म्हणजे, जेव्हा चेंडू बॅटच्या जवळ होता, त्याच वेळी त्याची बॅट देखील खेळपट्टीवर जोरात आदळली होती. जेव्हा तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहिला तेव्हा बॅट प्रथम खेळपट्टीला स्पर्श केल्याचे स्निकोमीटरमध्ये आढळले आणि त्याचा आवाज स्निकोमीटरवर ऐकू आला. पण पुढच्याच फ्रेममध्ये, चेंडू बॅटला लागल्याचे दिसताच, स्निकोमीटरवरील आवाज मोठा झाला.

तिसऱ्या पंचांनी हे लक्षात घेऊन रियान परागला बाद घोषित केले. पण रियान परागला हा निर्णय पटला नव्हता आणि त्याने थेट पंचांनाच प्रश्न विचारल आणि त्याने रिव्ह्यूमध्ये बॅट आधी जमिनीवर आदळल्याचे सांगितले. त्याची अ‍ॅक्शन पाहून दुसरा पंच तिथे पोहोचला आणि त्याने रियनला थेट पॅव्हेलियनमध्ये परतण्यास सांगितले. रियान निराश होत मैदानाबाहेर गेला आणि ड्रेसिंग रूमच्या दिशेने जाताना त्याने बॅट जोरात आपटली.