Riyan Parag Cried After Rajasthan Royals Defeat Video IPL 2025: आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाला सलग पाचव्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तर अगदी विजयाच्या उंबरठ्यावर येत राजस्थानने अखेरच्या षटकांमध्ये सलग तीन सामने गमावले आहेत. आरसीबीविरूद्ध सामन्यात संघ सुरूवातीपासून खूप मजबूत स्थितीत होता आणि राजस्थानचा विजय निश्चित दिसत होता. परंतु त्यानंतर, विकेट गमावत राजस्थानचा संघ शेवटी पराभूत झाला. राजस्थानच्या या पराभवानंतर कर्णधार रियान पराग रडताना दिसला.
आरसीबीने विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलच्या खेळीच्या जोरावर २०५ धावांचा टप्पा गाठला. प्रत्युत्तरात राजस्थानने रॉयल्सने वादळी सुरूवात केली. यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी पॉवरप्लेमध्ये ६० धावांचा टप्पा गाठला. तर जैस्वाल १९ चेंडूत ४९ धावा करत बाद झाला. यानंतर नितीश राणाने रियान परागच्या मदतीने संघाचा डाव उचलून धरला. दोघांनी मिळून संघाचा धावसंख्या ११० धावांपर्यंत नेला. पण पराग पुन्हा एकदा फ्लॉप झाला आणि २२ धावा काढून कृणाल पंड्याच्या चेंडूवर बाद झाला.
आता दुसऱ्या टोकावरून ध्रुव जुरेल मैदानात उतरला होता. संघाला विजयासाठी ४० चेंडूत ७२ धावांची आवश्यकता असताना कृणाल पंड्याने नितीश राणाला बाद करत महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. आता संपूर्ण जबाबदारी जुरेल आणि शिमरॉन हेटमायरवर होती. जुरेल सेट झाला होता आणि आता संघाला २५ चेंडूत ४८ धावा करायच्या होत्या. पण त्यानंतर जोश हेझलवूडने हेटमायरला ११ धावांवर बाद करून सर्वात मोठे यश मिळवून दिले. आता शुभम दुबे आणि जुरेल यांनी गीअर्स बदलले आणि सातत्याने धावा काढायला सुरुवात केली.
राजस्थानसाठी हा विजय ध्रुव जुरेलने निश्चित केला होता, कारण तो चांगली फटकेबाजी करत मैदानावर होता. त्याने भुवनेश्वरच्या षटकात २२ धावा करत सामना वळवला होता. पण हेजलवुडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आणि मग संघाने झटपट विकेट्स गमावत सामना हातून निसटला आणि आऱसीबीने ११ धावांनी विजय मिळवला.
संघाचा पराभव पाहून कर्णधारपद सांभाळत असलेल्या रियान परागच्या डोळ्यात अश्रू तरळलेय. संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत रियान संघाचे नेतृत्व करत आहे. पण त्याला संघाला एकच विजय मिळवून देता आला आहे. आरसीबीविरूद्ध सामना गमावताच मैदानावर हात मिळवण्यासाठी जाण्यापूर्वी तो रडताना दिसला तर त्याच्या संघातील सहकाऱ्याने पाठ थोपटत त्याचं सांत्वन केले. रियान परागचे रडतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.
राजस्थान रॉयल्सने सलग पाच सामने गमावले असून संघ ९ पैकी २ सामने जिंकत आठव्या स्थानी आहे. यानंतर आता राजस्थानचं प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा फारच कमी आहेत.