RR vs KKR IPL 2025 Riyan Parag Fan Video: आयपीएल २०२५ मधील पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेल्या राजस्थान रॉयल्सला सलग दुसऱ्या सामन्यातही पराभव पत्करावा लागला आहे. राजस्थान रॉयल्सवर केकेआरने ८ विकेट्सने विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सचे फलंदाज पूर्ण फेल ठरले आणि त्याचा फटका संघाला बसला, संघ फक्त १५१ धावा धावफलकावर जोडू शकला. ज्यात ध्रुव जुरेलने ३३ धावांची सर्वाधिक मोठी खेळी केली. यादरम्यान रियान परागला भेटण्यासाठी चाहता मैदानात घुसला होता.

रियान परागच्या नेतृत्वाखाली राजस्थानला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. रियानने विस्फोटक अंदाजात फलंदाजीला सुरूवात केली, पण मोठी खेळी करू शकला नाही. रियान परागने दुसऱ्या डावाता गोलंदाजी चांगली केली, पण जास्त धावा नसल्याने संघ विजय मिळवण्यात कमी पडला.

गुवाहाटीचं बारसपारा स्टेडियम हे रियान परागचं घरचं मैदान आहे, जिथे तो लहानपणापासून क्रिकेट खेळला आहे. या सामन्यादरम्यान एक चाहता सुरक्षेचा घेरा तोडून रियानला भेटायला मैदानात घुसला आणि थेट त्याच्या पाया पडला.

रियान परागच्या पाया पडला चाहता

रियान पराग डावातील १२वे षटक टाकण्यासाठी आला होता. रियानने याआधीची ३ षटकं खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि केकेआरच्या धावांना ब्रेक लावला होता. रियान पहिला चेंडू टाकणारच होता तेव्हा एक चाहता त्याच्याकडे धावत आला. यानंतर रियानने विचारलं काय झालं आणि मागे पाहिलं तर चाहता मैदानात घुसला होता. चाहत्याने आधी रियानच्या पायाला स्पर्श केला आणि नंतर राजस्थानच्या कर्णधाराला मिठी मारली.

दरम्यान, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिथे पोहोचून त्या चाहत्याला बाहेर नेले. आयपीएल २०२५ मध्ये ही दुसरी वेळ आहे, जेव्हा एखाद्या चाहत्याने त्याच्या आवडत्या क्रिकेटरला भेटण्यासाठी सुरक्षा भेदून मैदानात प्रवेश केला आहे. याआधी KKR आणि RCB यांच्यात झालेल्या सामन्यात विराट कोहलीला अशाच पद्धतीने भेटण्यासाठी एक चाहता मैदानात आला होता.

Riyan Parag Fan Invades Pitch in RR vs KKR
रियान परागला भेटण्यासाठी चाहता घुसला मैदानात (फोटो-एक्स)

केकेआरविरुद्ध रियान पराग मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. रियानने दमदार शैलीत सुरुवात करत १६६ च्या सर्वाधिक स्ट्राईक रेटने काही चांगले फटके मारले. मात्र, १५ चेंडूत २५ धावा केल्यानंतर रियान वरुण चक्रवर्तीच्या फिरकीत अडकला आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत खेळला. डी कॉकने सोपा झेल घेत रियानला माघारी धाडले. रियानने आपल्या खेळीत तीन षटकार लगावले. हैदराबादविरुद्धही रियान फलंदाजीत विशेष काही करू शकला नाही आणि केवळ ४ धावा करून बाद झाला होता.