महेंद्रसिंह धोनी हे नाव माहित नाही असं क्वचितच कोणी सापडेल. क्रिकेटप्रेमी चाहत्यांच्या मनात धोनीने एक आगळे स्थान निर्माण केले आहे. आता धोनीने पुन्हा एकदा तो जगातील बेस्ट फिनिशर्सपैकी एक असल्याचं सिद्ध केलं. याची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसला. यावर भारतीय क्रिकेटर रॉबिन उथप्पानेही प्रतिक्रिया दिली. त्यात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
मायक्रो-ब्लॉगिंग अॅप कूवर भारतीय क्रिकेटर रॉबिन उथप्पाने पोस्ट करत म्हटलं, “माझ्यासाठी एक खास सामना… २०० व्या विजयासोबत! सॉलिड चेन्नई सुपर किंग्ज संघ! महेंद्रसिंह धोनीला इतक्या स्टाईलमध्ये सामना जिंकताना पाहायला कधीही थकत नाही.”
सामन्यात नेमकं काय झालं?
गुरुवारी (२१ एप्रिल) रात्री चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स दरम्यान सामना खेळला गेला. यादरम्यान मॅचमध्ये रोहितची पलटन पूर्णत: वरचढ होती. मात्र, अनेक चढउतारांनंतर सीएसकेला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी १७ धावा हव्या असताना धोनीचा झंजावात पहायला मिळाला. लक्ष्य अवघड नक्कीच होते. मात्र धोनीच्या डिक्शनरीमध्ये काहीच अशक्य नाही. मग काय, माहीने धुआँधार चौका मारत आपल्या टीमला तीन विकेटने शानदार विजय मिळवून दिला.
आयपीएल २०२२ च्या हंगामात मुंबईचा सलग ७ वा पराभव
मुंबईला विजयासाठी १७ चेंडूंवर ४१ धावा वाचवायच्या होत्या. मिस्टर फिनिशरच्या नावाने प्रख्यात माहीने पुन्हा एकदा या बिरुदाला जागत आपल्या टीमला या सीझनचा दुसरा विजय मिळवून दिला. यासोबतच मुंबईला सलग ७ वा पराभव पचवावा लागला. आयपीएलच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे जेव्हा कुठल्या फ्रॅंचायझीला सतत सात मॅचेसमध्ये हार पत्करावी लागली.
चेन्नईकडून धोनीने १३ चेंडूंवर नाबाद २८ धावा काढल्या. अंबाती रायडूने सर्वाधिक ३५ चेंडूंवर ४० धावा काढल्या. याशिवाय रॉबिन उथप्पाने २५ चेंडूंवर ३० धावांचे योगदान दिले.
याआधी मुंबईकडून तिलक वर्माने ४३ चेंडूंवर ५१ धावांचा नाबाद खेळ केला होता. याच बळावर मुंबईच्या टीमने निर्धारित २० ओव्हर्समध्ये सात विकेट गमावत १५५ धावा केल्या. मुंबईने २३ धावांवरच तीन विकेट गमावल्या होत्या. पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित शर्मा आणि ईशान किशन आउट झाले. तरुण गोलंदाज मुकेश चौधरीने दोघांनाही बाद केले. यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये देवाल्ड ब्रेविस हे विकेटच्या मागे महेंद्र सिंह धोनीकडून बाद झाले.
हेही वाचा : सीएसकेचा कर्णधार रविंद्र जाडेजा, पण निर्णय मात्र धोनीच घेतो ? २ माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केली नाराजी
या पार्श्वभूमीवर रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईची टीम १०० धावाही करू शकणार नाही, असं वाटत होतं. मात्र, आधी सूर्यकुमार यादवने २१ चेंडूत ३२ धावांचे योगदान दिले, मग रितिक शौकीनने २५ चेंडूत २५ धावा काढल्या. शेवटी जयदेव उनाडकटनेही ९ चेंडूत नाबाद १९ धावा काढल्या. यामुळे मुंबईची टीम सन्मानजनक धावसंख्या उभी करू शकली.