MS Dhoni’s Argument With Umpire In IPL 2019: आयपीएल २०२३ मधील ३६ वा सामना गुरुवारी सीएसके आणि आरआर संघात खेळला गेला. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ३२ धावांनी पराभव केला. मात्र, या सामन्यादरम्यान सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत एक महत्वाची बाब समोर आली आहे. माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा, जो बराच काळ धोनीचा मैदानात साथीदार राहिला आहे, त्याने माहीला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचा पश्चात्ताप होतो, याबाबत खुलासा केला आहे.
खरे तर धोनीला क्रिकेटच्या मैदानावर कॅप्टन कूल म्हणून ओळखले जाते. पण २०१९ मध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ड यांच्यात झालेल्या सामन्यात असे काही घडले की, धोनीचा संयम सुटला. एवढेच नाही तर तो डगआऊटमधून मैदानात पंचांशी वाद घालण्यासाठी पोहोचला होता. उथप्पा म्हणतो की, धोनीला याचा नेहमीच पश्चाताप राहिल.
२०१९ मध्ये दोन्ही संघांमधील सामन्यात, सीएसकेने २४ धावांत चार विकेट गमावल्या. यानंतर धोनीने ५८ आणि रायडूने ५७ धावांची इनिंग खेळून सीएसकेला सावरले. शेवटच्या षटकात सीएसकेला विजयासाठी १८ धावांची गरज होती. जडेजाने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून सामना रोमांचक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्टोक्सने धोनीची विकेट घेतली.
नो बॉलवरुन निर्माण झाला होता वाद –
यानंतर सँटनर फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याला स्टोक्सने चेंडू फुलटॉस टाकला. अंपायरने तो नो बॉल दिला. त्यानंतर लेग अंपायरने हा निर्णय बदलून हा चेंडू योग्य ठरवला. या प्रकारावर धोनी संतापला आणि मैदानात पोहोचला आणि पंचांशी वाद घालू लागला.
या निर्णयामुळे सामन्याच्या निकालात काहीही फरक पडला नाही. सँटनरने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत सीएसकेला विजय मिळवून दिला. या घटनेचा उल्लेख जिओ सिनेमावरील संवादादरम्यान करताना उथप्पा म्हणाला, मी याबाबत धोनीशी बोललो. त्याने मला सांगितले की मी खूप नाराज झालो होता आणि मैदानावर गेलो.”
मी त्याला असे कधी पाहिले नव्हते –
उथप्पा पुढे सांगताना म्हणाला की धोनी म्हणाला,” मी पाहिले की मुख्य पंच नो बॉल देण्यासाठी हात वर करत होते. फक्त स्ट्रेट पंच खेळावर नियंत्रण ठेवतात. एकदा तुम्ही नो बॉल दिला की तुम्ही तो बदलू शकत नाही. यानंतर तो रागाने मैदानात गेला. धोनीने याबाबत नंतर खेद व्यक्त केला. तो म्हणाला की मी आत जायला नको होते. मी त्याच्या मागे बसलो होतो आणि विचार करत होतो की तो कुठे जात आहे. मी त्याला असे कधी पाहिले नव्हते.”