Robin Uthappa told on MS Dhoni: आयपीएल २०२३ मध्ये, एमएस धोनी सतत खेळत आहे. त्याने एकाही सामन्यात विश्रांती घेतलेली नाही. परंतु माही सध्या गुडघ्याच्या दुखापतीशी संघर्ष करत आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो धावू शकत नसल्याने विकेटच्या दरम्यान धावा काढू शकत नाही. धोनीने या मोसमातील शेवटचा साखळी सामना त्याच्या होम ग्राउंड चेपॉकवर खेळला, त्यानंतर त्याने मैदानावर फिरून प्रेक्षकांचे आभार मानले. त्यावेळीही तो गुडघ्यावर सेफ्टी पॅड घातलेला दिसत होता. दरम्यान आता रॉबिन उथप्पाने एमएस धोनीबाबत एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
धोनी निःसंशयपणे दुखापतग्रस्त आहे, परंतु तो संघासाठी खेळत आहे. आता सर्वाधिक चर्चा त्याच्या निवृत्तीची होत आहे. याबाबत त्याचा जवळचा मित्र सुरेश रैना म्हणाला की, तो पुढच्या वर्षी खेळणार आहे. काही दिवसांपूर्वी सीएसके संघाचे सीईओ कासी विश्वनाथ म्हणाले होते की, मला वाटते की धोनी पुढच्या वर्षीही आमच्यासोबत असेल. त्याचवेळी या संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही सांगितले की, धोनी कधी निवृत्ती घेणार हे आम्हाला माहीत नाही.
आता धोनी कोणत्या अटीवर आयपीएलमध्ये खेळणार, याबाबत रॉबिन उथप्पाने सांगितले आहे. धोनीचा जुना सहकारी रॉबिन उथप्पा म्हणाला की, “मी धोनीनंतर सीएसकेची कल्पना करू शकत नाही. मला वाटते की धोनी नेहमीच एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये सीसएके संघाचा भाग असेल.”
हेही वाचा – VIDEO: “…तेव्हा सरावानंतर आम्ही एग रोल आणि सॉफ्ट ड्रिंक्स प्यायचो”; विराटसोबतच्या मैत्रीबद्दल इशांतचा खुलासा
यावेळी धोनीच्या संघाने विजेतेपद पटकावले तर तो त्याचा शेवटचा सीझन असेल का? यावर उथप्पा म्हणाला की, “धोनीची क्रिकेटची आवड अजूनही संपलेली नाही. तो अजूनही गुडघ्याच्या दुखापतीशी झुंजत असला तरी मला वाटते की त्याची दुखापत बरी झाल्यास तो पुढच्या मोसमात खेळू शकेल, परंतु जर त्याची दुखापत बरी झाली नाही तर तो त्याचा शेवटचा हंगाम ठरू शकतो.”
पराभव झाल्यास चेन्नई इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून –
चेन्नई सुपर किंग्ज या मोसमात दुसऱ्यांदा दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यापूर्वी दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा चेन्नईने २७ धावांनी सामना जिंकला होता. मात्र, या सामन्यात सीएसकेचा पराभव झाला तर त्यांना इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. त्यामुळे प्लेऑफच्या दृष्टीने चेन्नईसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे.