Rohit Sharma First Indian to hit 250 sixes in IPL: आयपीएल २०२३ च्या ३१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्जकडून १३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला असेल, परंतु संघाचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात इतिहास रचला आहे. पीबीकेएसविरुद्ध हिटमॅनने २७ चेंडूत ४ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार मारत ४४ धावांची शानदार खेळी खेळली. या तीन षटकारांसह रोहित शर्माने आयपीएलमध्ये २५० षटकार पूर्ण केले. हा टप्पा गाठणारा रोहित पहिला भारतीय ठरला. होय, रोहित शर्मापूर्वी केवळ दोनच फलंदाजांनी आयपीएलमध्ये २५० षटकारांचा आकडा पार केला होता आणि ते दोघेही भारतीय खेळाडू नाहीत.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलच्या नावावर आहे. वेस्ट इंडिजच्या या धडाकेबाज सलामीवीराने इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळलेल्या १४१ डावांमध्ये सर्वाधिक ३४७ षटकार मारले आहेत. दुसरीकडे, २५१ षटकार मारण्याचा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. हे दोन्ही फलंदाज आता आयपीएल खेळत नाहीत, त्यामुळे रोहितला आयपीएलमध्ये सिक्सर किंग बनण्याची मोठी संधी आहे.
भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले, तर रोहित शर्मा आता २५० षटकारांसह अव्वल स्थानावर आहे. त्याच्या खालोखाल चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी दुसऱ्या तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा – IPL 2023 MI Vs PBKS: पंजाबची सुरुवात खराब झाल्यानंतर कर्णधार सॅम करनचं वादळ आलं अन्….पाहा Video
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू –
ख्रिस गेल – ३५७
एबी डिव्हिलियर्स – २५१
रोहित शर्मा – २५०*
एमएस धोनी – २३५
विराट कोहली – २२९
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्जचा सामना कसा राहिला?
या सामन्यात एमआयचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या १० षटकांमध्ये पंजाबने ४ विकेट गमावल्या होत्या, तोपर्यंत रोहित शर्माचा निर्णय योग्य असल्याचे दिसत होते, परंतु त्यानंतर कर्णधार सॅम करनने हरप्रीत सिंग आणि इतर खेळाडूंसोबत धावगती वाढवल्याने मुंबईच्या अडचणी वाढल्या. सॅम करनने ५५ धावांची शानदार खेळी करत संघाला २१४ धावांपर्यंत नेले.
प्रत्युत्तरात मुंबईचा संघ २० षटकांत ६ गडी गमावून २०१ धावाच करू शकला. कॅमेरून ग्रीनने ४३ चेंडूत ६७ धावा, सूर्यकुमार यादवने २६ चेंडूत ५७ धावा आणि कर्णधार रोहित शर्माने २७ चेंडूत ४४ धावा केल्या. त्याचबरोबर पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत २९ धावा देत ४ विकेट घेतल्या. त्याने शेवटच्या षटकात फक्त दोन धावा दिल्या.