Rohit Sharma Shardul Thakur IPL 2025 Video: आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स संघाची गाडी रूळावर आली असून संघाने सलग ४ सामने जिंकत प्लेऑफच्या शर्यतीत मोठी झेप घेतली आहे. दरम्यान मुंबईचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. संघाचा पुढचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स संघाविरूद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूरचा एक व्हीडिओ समोर आला आहे.
मुंबई वि. लखनौ या सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी नेटमध्ये खूप सराव केला. यादरम्यान रोहित शर्मा लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज शार्दुल ठाकूरची फिरकी घेताना दिसला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई इंडियन्सने हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअऱ केला आहे.
रोहित शर्मा मैदानावर सराव सत्रासाठी उपस्थित होता. दरम्यान तो लखनौ संघाचा मेन्टॉर झहीर खानबरोबर गप्पा मारताना दिसत आहे. पण शार्दुल ठाकूर येताना दिसताच रोहित मुंबईच्या स्लँग भाषेत लर्ड ठाकूरची फिरकी घेतो. रोहित शार्दुलला म्हणतो, “काय रे ए हिरो, आता येतोय तू, घरची टीम आहे काय…”, हे ऐकून सर्वच जण हसायला लागतात. शार्दुलही रोहितच्या दिशेने जाताना हसत असतो .
मुंबई इंडियन्सने हा व्हीडिओ शेअऱ करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘When बोरीवली meets पालघर….’ रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर हे दोघेही मूळचे मुंबईचे आहेत. रोहित शर्मा बोरीवलीमध्ये लहानाचा मोठा झाला. तर शार्दुल हा मूळचा पालघरचा आहे. त्यामुळे असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
मुंबई-लखनौमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यापूर्वी देखील रोहित आणि शार्दुलचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये रोहित शर्मा शार्दुल ठाकूर आणि झहीर खानची भेट घेताना दाखवलं होतं.
शार्दुल ठाकूरने त्याचा नवीन संघ एलएसजीसाठी गोलंदाजीत उत्तम फॉर्म मिळवला आहे. आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिलेला शार्दुल मोहसीन खानच्या दुखापतीमुळे बदली खेळाडू म्हणून संघात सामील झाला. रोहितने आयपीएल २०२५ मध्ये आपला फॉर्म परत मिळवला आणि मुंबईची गाडी देखील रूळावर आली आहे.