IPL 2025 MI vs LSG Rohit Sharma Abdul Samad Viral Video: रोहित शर्माने खराब सुरूवातीनंतर आयपीएल २०२५ मध्ये दणक्यात पुनरागमन करत आपला फॉर्म परत मिळवला आहे. रोहितने लागोपाठ दोन अर्धशतकं झळकावत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यादरम्यान रोहित शर्माचा एक व्हीडिओ लखनौ सुपर जायंटसने शेअर केला आहे. यामध्ये रोहित शर्मा लखनौच्या युवा खेळाडूशी चर्चा करत आहे.
मुंबई इंडियन्सचा पुढील सामना लखनौ सुपर जायंट्स संघाविरूद्ध होणार आहे. तर हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडेवर होणार आहे. यापूर्वी दोन्ही संघ मैदानावर सराव करताना दिसत आहेत. तर दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांशी भेट घेत आहेत. दरम्यान रोहित शर्मा लखनौच्या युवा खेळाडूला अब्दुल समदला फलंदाजीच्या टिप्स देताना दिसत आहे. रोहित शर्मा स्टाईल टिप्स अब्दुलही शांतपणे ऐकताना दिसतोय. तर शंका असल्यास रोहितला प्रश्नही विचारतोय. अब्दुल समद हा जम्मू -काश्मीरचा एक स्टार क्रिकेटपटू आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून तो आयपीएलचा भाग आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा स्फोटक फलंदाज अब्दुल समद रोहित शर्माबरोबर चर्चा करताना दिसत आहे. दोन्ही संघांमधील सामन्यापूर्वी रोहितने अब्दुल समदला नेटवर फलंदाजीच्या महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या. यादरम्यान रोहितने अब्दुल समदला खेळपट्टीपासून ते शॉट सिलेक्शनपर्यंत सर्व काही सांगितलं. प्रत्येक क्रिकेट चाहता रोहित शर्माचं क्रिकेटचं ज्ञान पाहून त्याचं कौतुक करत आहे.
अब्दुल समदला फलंदाजीच्या टिप्स देताना रोहित शर्मा म्हणाला, “विकेटचा पण एक वेग असतो. प्रत्येक दिवस वेगळा असतो. आज दमट हवामान आहे, त्यामुळे चेंडू हळू येईल. उद्या वारा असेल तर खेळपट्टी चांगली खेळते. जोपर्यंत मैदानावर जाऊन तू खेळत नाही तोपर्यंत याचा अंदाज येत नागी. मैदानावर येऊन तू कसा फटके खेळतोस हे तुझ्यावर असणार आहे.”
रोहित शर्मा पुढे म्हणाला, “सर्वच गोष्टी टेक्निकवर नाही चालत असं मानून चालू, चल. पण तू माझ्यासारखा नाही खेळू शकत, मी तुझ्यासारखा नाही खेळू शकत. तुझ्याकडे तुझं वेगळं टॅलेंट आहे. मी तुझी कॉपी करण्याचा प्रयत्न करेन, मी तुझी कॉपी करेन, याची टेक्निक बघूया, त्याची टेक्निक बघतो. हे करत राहिला तर आयुष्य निघून जाईल. सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे तर तुझे विचार. तू कसा विचार करतो आणि ते कसं अंमलात आणतो, हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.”
२३ वर्षीय फिनिशर अब्दुल समद २०२० पासून आयपीएलचा भाग आहे. त्याने या हंगामात ८ सामन्यांमध्ये १९४.८२ च्या स्ट्राईक रेटने ११३ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध ११ चेंडूत ३० धावांची खेळी लक्षवेधी ठरली. याआधी तो सनरायझर्स हैदराबादकडून ५ वर्षे खेळला होता. त्यादरम्यानही त्याने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले होते.