IPL 2025 LSG vs MI Rohit Sharma Video: मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२५ मधील चौथा सामना लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध खेळवला जात आहे. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण लखनौच्या सलामीवीरांनी वादळी सुरूवात करत पॉवरप्लेमध्येच ६९ धावांचा टप्पा गाठला. मिचेल मार्श आणि एडन मारक्रमच्या जोडीने विस्फोटक सुरूवात केली. अखेरीस रोहित शर्माच्या एका युक्तीने संघाला पहिली विकेट मिळवून दिली.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स वि. लखनौ सुपर जायंट्स सामन्यात प्लेईंग इलेव्हनचा भाग नाहीये. सामन्यापूर्वी सराव करताना रोहित शर्माच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो संघाबाहेर आहे. तर रोहित शर्माच्या जागी नवा खेळाडू राज अंगद बावाला पदार्पणाची संधी मिळाली. पण फक्त ब्रेकमध्ये येऊन रोहित शर्माने दिलेल्या सल्ल्यामुळे संघाला पहिली विकेट मिळाली.

पॉवरप्लेमध्ये लखनौच्या सलामीवीरांनी विस्फोटक खेळी केली. मिचेल मार्शने वादळी फलंदाजी करत संघाला ६ षटकांत ६९ धावांचा टप्पा गाठून दिला. बोल्टची २ षटकं, चहर,सँटनरचं १-१ षटक, सँटनर, तर अश्वनी कुमारची २ षटकं मुंबईकडून टाकण्यात आली. पण मार्शने प्रत्येक चेंडूवर वादळी फटकेबाजी केली आणि पॉवरप्लेमध्ये २७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर पॉवरप्लेनंतर स्ट्रॅटेजिक टाईम आऊट घेण्यात आला.

टाईमआऊटमध्ये रोहित शर्माही मैदानावर आला होता. रोहितने हार्दिकला हातवारे करत फिरकीपटूला आणण्याचा सल्ला दिला. हार्दिकने लगेच रोहितचं ऐकलं आणि विघ्नेश पुथूरला सातवे षटकं टाकायला दिले. विघ्नेश चांगली सुरूवात करत पहिल्या तिन्ही चेंडूवर एकही धाव दिली नाही. पण मारक्रमने चौथ्या चेंडूवर त्याला षटकार लगावला, पण विघ्नेशने आपली गोलंदाजी सुरूच ठेवली. पाचव्या चेंडूवर मारक्रमने एक धाव काढली आणि ६० धावा करून मैदानात असलेल्या मार्शला स्ट्राईक दिली.

विघ्नेशने षटकातील अखेरचा चेंडू स्लोअर बॉल टाकला आणि मार्शने समोरच्या दिशेने फटका खेळला. विघ्नेशने चेंडूवर लक्ष ठेवत समोरच्या दिशेन येणार चेंडू उत्कृष्टपणे टिपला आणि संघाला महत्त्वाचा ब्रेकथ्रू मिळवून दिला. विघ्नेशने विकेट मिळवलेली पाहताच डगआऊटमध्ये बसलेल्या रोहित शर्माने टाळ्या वाजवत त्याचं कौतुक केलं. पहिल्या विकेटनंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. तर रोहितने मैदानावर येऊन दिलेला सल्लाही त्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

विघ्नेश पुथूरने या सामन्यात चांगली गोलंदाजी करत लखनौच्या धावांवर अंकुश ठेवला. विघ्नेशने ४ षटकांत ३१ धावा देत १ विकेट घेतली. तर लखनौने पहिल्या डावात फलंदाजी करत २०२ धावा केल्या आहेत.