Rohit Sharma first Indian to hit 500 sixes in T20 : आयपीएलच्या १७व्या हंगामातील २९ सामना सर्वात रोमांचक सामना राहिला. कारण या सामन्यातील पहिल्या डावात माजी सीएसके कर्णधार एमएस धोनीने एक नवीन विक्रम केला, तर दुसऱ्या डावात मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने एक विशेष विक्रम केला. या दोन्ही फलंदाजांनी असे विक्रम केले आहेत जे आजपर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाला करता आलेले नाहीत. या सामन्यात आधी धोनीची जादू दिसली आणि नंतर दुसऱ्या डावात हिटमॅनचा षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. ज्यामुळे आता रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये ५०० षटकार मारत नवा इतिहास रचला. मात्र तो मुंबई संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. ज्यामुळे मुंबईला चेन्नईविरुद्ध २० धावांनी पराभव पत्करावा लागला.
रोहित शर्मा ठरला भारताचा सिक्सर किंग –
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माची जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. या सामन्यात रोहितने तिसरा षटकार ठोकताच टी-२० क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. रोहित शर्मा आता टी-२० क्रिकेटमध्ये ५०० हून अधिक षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. या सामन्यापूर्वी रोहितच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये ४९७ षटकार होते. या सामन्यात रोहितने चेन्नईच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपले.
या यादीत रोहितनंतर कोणते भारतीय फलंदाज आहेत?
रोहित शर्मा आता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. या यादीत विराट कोहलीचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३८३ षटकार मारले आहेत. याशिवाय टीम इंडिया आणि सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनीचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. एमएस धोनीच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये ३२८ षटकार आहेत. या यादीत चौथ्या क्रमांकावर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाचे नाव आहे. टी-२० क्रिकेटमध्ये रैनाच्या नावावर ३२५ षटकार होते.
रोहित शर्माच्या शतकानंतरही मुंबईचा पराभव झाला –
चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचा २० धावांनी पराभव केल्यानंतर त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सची गुणतालिकेत आठ गुणांसह बरोबरी केली आहे. ०.७२६ च्या निव्वळ रनरेटसह गुणतालिकेत संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी मुंबईचा संघ चार गुणांसह आठव्या स्थानावर आहे. प्रथम फलंदाजी करताना सीएसके संघाने २० षटकात ४ गडी गमावून २०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने २० षटकांत ६ गडी गमावून १८६ धावा केल्या.
रोहितने आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले –
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने दमदार कामगिरी करत आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्याने आपले शतक ६१ चेंडूत पूर्ण केले. या सामन्यात ३६वर्षीय फलंदाजाने ६३ चेंडूत ११ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद १०५ धावा केल्या. मात्र, तो आपल्या संघाला सलग तिसऱ्या विजयापर्यंत नेऊ शकला नाही. चेन्नईच्या या सामन्यात मथीशा पाथिरानाने चार तर तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमानने प्रत्येकी एक विकेट घेतली.