MI beat DC by 29 runs : आयपीएल २०२४ चा २० वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना मुंबईने २९ धावांनी जिंकला. या हंगामात सलग तीन पराभवानंतर मुंबईचा हा पहिला विजय ठरला. या सामन्यात मुंबईची फलंदाजी आणि गोलंदाजीही अप्रतिम होती. मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयात हे पाच खेळाडू हिरो ठरले आहेत. ज्यानी या सामन्यात शानदार कामगिरी केली आणि विजयात महत्त्वाची भूमिका निभावली.

१. रोहित शर्मा

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि संघाचा सलामीवीर रोहित शर्माने तुफानी खेळी केली. रोहितने सामन्यात संघाला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यात रोहित शर्माने २७ चेंडूत ४९ धावांची खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान रोहितने ६ चौकार आणि ३ शानदार षटकार मारले. ज्यामुळे मुंबई संघाला वेगवान सुरुवात करण्यास मदत झाली.

२. इशान किशन

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दुसरा सलामीवीर इशान किशननेही संघाला वेगवान सुरुवात करून दिली. इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी सुरुवातीला आक्रमक फलंदाजी करत संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या सामन्यात इशानने २३ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान किशनने ४ चौकार आणि २ षटकार मारले. या दरम्यान रोहितसह पहिल्या विकेटसाठी ८० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.

हेही वाचा – MI vs DC : मुंबई इंडियन्सने उघडले विजयाचे खाते, दिल्ली कॅपिटल्सचा २९ धावांनी उडवला धुव्वा

३. टिम डेव्हिड

या सामन्यात टीम डेव्हिडने शानदार फलंदाजी केली. त्यामुळे मुंबईचा संघ २०० हून अधिक धावा करण्यात यशस्वी ठरला. या सामन्यात टीम डेव्हिडने २१ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. टीम डेव्हिडने आपल्या खेळीत २ चौकार आणि ४ षटकार मारले.

४. रोमारियो शेफर्ड –

या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या विजयात रोमारियो शेफर्डने महत्त्वाची भूमिका बजावली. फलंदाजी करताना रोमारियो शेफर्डने अवघ्या १० चेंडूत ३९ धावांची खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान रोमॅरियो शेफर्डने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. याशिवाय रोमारियोनेही गोलंदाजी करताना एक विकेट घेतली.

हेही वाचा – VIDEO : रोहितने सांगितलं ‘या’ दोन क्रिकेटपटूंसह कधीच रूम शेअर करणार नाही; म्हणाला, “ते दोघे राहतात अगदी गचाळ…’

५. जेराल्ड कोएत्झी

जेराल्ड कोएत्झीने गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. या सामन्यात जेराल्डने ४ षटकात ३४ धावा देत ४ बळी घेतले.विशेष म्हणजे यामधील तीन विकेटस त्याने शेवटच्या षटकात घेतल्या. ज्यामध्ये ललित यादव, कुमार कुशाग्रा आणि झाय रिचर्डसन यांना बाद केले.