IPL 2024 Rohit Sharma Batting Form: आयपीएल २०२४ मधील ५५ वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सूर्यकुमार यादवची धमाकेदार, शानदार फलंदाजी पाहायला मिळाली. सूर्याने हैदराबादविरुद्ध शानदार शतक ठोकले, यामुळे मुंबईने हैदराबादचा ७ गडी राखून पराभव केला. मात्र, या सामन्यात रोहित शर्मा पूर्णपणे फ्लॉप ठरला. सीझनची सुरुवात शानदार करणाऱ्या रोहित शर्माची खेळी गेल्या सहा सामन्यांमध्ये खराब होताना दिसतेय. सीआरएचविरुद्धच्या सामन्यातही रोहितने विशेष धावा केल्या नाहीत, ज्यामुळे तो खूपच निराश दिसत होता.
मात्र, या सामन्यानंतर रोहितला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. अनेकांनी आयपीएल २०२४ मधील रोहितच्या फ्लॉप प्रदर्शनानंतर थेट त्याला राजीनामा दे असे म्हणत संताप व्यक्त केला आहे
रोहितला सोशल मीडियावर केलं जातंय ट्रोल
एका युजरने लिहिले की, रोहित शर्मा आपल्या स्कोरमधून त्याचा जर्सी नंबर प्रोमोट करतोय.
दुसऱ्या एका युजरने लिहिले की, अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या टी-20 विश्वचषकातील निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला हवा! कदाचित १५ निवडक खेळाडूंपैकी सर्वात वाईट कामगिरी करणारा आणि सध्याचा सर्वात वाईट फॉर्म असलेला खेळाडू.
तिसऱ्या एका युजरने लिहिले की, रोहित शर्मा तू आजच आगरकरांशी कॉलवर बोलून तुझा टी-20 संघातील राजीनामा सोपवणे गरजेचे आहे. भावा, या फॉर्मसह तू WC मध्ये जाऊ शकत नाही… सॉरी नॉट सॉरी!!
आणखी एका युजरने लिहिले की, रोहित शर्मा टी-20 विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणार आहे. पण, त्याच्या आयपीएलमधील अशा दयनीय कामगिरीनंतर त्याचे चाहते विराट कोहलीला ट्रोल करण्याचे धाडस करतायत.
रोहितची आयपीएलमधील कामगिरी भारतीय संघासाठी चांगला संकेत नाही; कारण तो यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात मेन इन ब्लूचे नेतृत्व करणार आहे.
सोमवारी एसआरएचविरुद्धच्या बहुचर्चित लढतीबद्दल बोलायचे झाल्यास, रोहितला पॅट कमिन्सने केवळ ४ धावांवर बाद केले. १७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून खाते उघडले, पण कमिन्सने त्याच्यावर चांगली कामगिरी केली. तो पॅट कमिन्सच्या लेन्थ बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार मारण्याच्या प्रयत्नात असताना हेनरिक क्लासेनने त्याला आऊट केले. कमिन्सने रोहितला टी-२० मध्ये आऊट करण्याची ही चौथी वेळ होती.
रोहित शर्माची ढासळत चाललेली कामगिरी
रोहित शर्माने इंडियन प्रीमियर लीगची शानदार सुरुवात केली. त्याने पहिल्या सहा सामन्यांत आपल्या बॅटने शतक झळकावले आणि संघासाठी महत्वाची भूमिका बजावली. रोहितने पहिल्या सहा सामन्यांत ४३, २६,०,४९, ३८,१०५ धावा केल्या होत्या. एकूण सहा सामन्यांत रोहितने २६१ धावा केल्या. रोहितची फलंदाजी पाहता तो आगामी सामन्यांमध्ये धमाका करेल असे वाटत होते. मात्र, तसे काही झाले नाही. शतक ठोकल्यानंतर रोहितचा फॉर्म घसरला.
रोहित शर्माच्या आयपीएलमधील शेवटच्या सहा सामन्यांमधील कामगिरीवर नजर टाकली तर त्याने सहा सामन्यांत अनुक्रमे ३६, ६, ८, ४,११, ४ धावा केल्या आहेत. रोहितला फलंदाजीच्या चार सामन्यात दुहेरी आकडाही गाठता आला नाही. अशाप्रकारे रोहितने गेल्या सहा सामन्यांत केवळ ६९ धावा केल्या आहेत. रोहितची अशी ढासळत चाललेली कामगिरी पाहून भारतीय संघाचा तणाव वाढताना दिसतोय.