Why Rohit Sharma is Not Playing in LSG vs MI Match: आयपीएल २०२५ मधील मुंबई इंडियन्सचा चौथा सामना लखनौ सुपर जायंट्स संघाविरूद्ध होत आहे. हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकल्यानंतर प्लेईंग इलेव्हन सांगताना सर्वांनाच धक्का दिला. रोहित शर्मा लखनौविरूद्धच्या मुंबईच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर झाला आहे. हार्दिकने नाणेफेकीनंंतर या मोठ्या निर्णयामागचं कारणही सांगितलं आहे.
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू रोहित शर्मा संघाबाहेर झाला आहे. रोहितला लखनौविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही, तर तो इम्पॅक्ट प्लेअर्सच्या यादीतही नाही. रोहित शर्माला दुखापतीमुळे संघात स्थान मिळाले नाही. रोहित शर्मा अखेरचा सामन्यातील आयपीएल २०२१ मध्ये संघाबाहेर झाला होता.
रोहित शर्माचा फॉर्म
आयपीएल २०२५ मध्ये रोहित शर्मा खूपच खराब फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. हा अनुभवी खेळाडू सलग तीन सामन्यांमध्ये अपयशी ठरला. चेन्नईविरुद्ध रोहितला खातेही उघडता आले नाही. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याच्या बॅटमधून फक्त ८ धावा आल्या, तर केकेआरविरुद्ध या खेळाडूने १३ धावा केल्या. म्हणजे ३ सामन्यात रोहितने फक्त २१ धावा केल्या.
नाणेफेकीच्या वेळेस हार्दिकला प्लेईंग इलेव्हनबद्दल विचारलं तेव्हा हार्दिक म्हणाला, “रोहित शर्मा संघाबाहेर झाला आहे. त्याला काल नेट्समध्ये सराव करताना गुडघ्याला दुखापत झाली होती त्यामुळे तो खेळताना दिसणार नाही.” हार्दिक पांड्याने सांगितले की, रोहित शर्माच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये सराव करत असताना त्याला दुखापत झाली. रोहित शर्माची दुखापत किती गंभीर आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही. रोहित शर्मासह तिलक वर्माही प्लेईंग इलेव्हनचा भाग नसेल, पण त्याचा इम्पॅक्ट प्लेअर खेळाडूंच्या यादीत समावेश आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह लवकरच संघात येईल असेही हार्दिक म्हणाला.
मुंबई इंडियन्सकडून नव्या खेळाडूचं पदार्पण
मुंबई इंडियन्सने आपल्या संघातून आणखी एका युवा खेळाडूला पदार्पणाची संधी दिली आहे. पंजाबचा अष्टपैलू खेळाडू राज अंगद बावा रोहित शर्माच्या जागी संघात खेळताना दिसणार आहे. राज अंगद बावा चंदीगडसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. या खेळाडूने ११ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४२ पेक्षा जास्त सरासरीने ६३३ धावा केल्या आहेत. टी-२० मध्ये त्याच्या नावावर २३ पेक्षा जास्त सरासरीने ३०८ धावा आहेत. याशिवाय त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १३ विकेट्स घेतल्या आहेत आणि टी-२० मध्ये २२ विकेट घेतल्या आहेत.
Hardik: "RO misses out tonight due to an injury he got in the nets yesterday."#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #LSGvMI
— Mumbai Indians (@mipaltan) April 4, 2025
मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन
विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज अंगद बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, दीपक चहर, विघ्नेश पुथूर