Rohit Sharma Instagram Story For Vaibhav Suryavanshi: आयपीएल २०२५ स्पर्धेत १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या तुफान फटकेबाजीने हवा केली आहे. ज्या वयात मुलं अंडर १४ क्रिकेट खेळत असतात, त्याच वयात वैभवने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेल्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. वैभवने आधी या हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. त्यानंतर या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात युवा शतकवीर होण्याचा मानही पटकावला.
वैभव सूर्यवंशीने आपल्या आयपीएल पदार्पणातील पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला होता. हा षटकार खेचून त्याने सर्वांना दाखवून दिलं होतं की, आपल्याला १.१ कोटींची बोली लावून संघात का घेतलं आहे. आता विक्रमी शतक झळकावल्यानंतर वैभववर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने देखील इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी शेअर करून त्याचं कौतुक केलं आहे.
वैभवचं रोहितकडून कौतुक
वैभवने या सामन्यात फलंदाजी करताना आधी १७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हे या हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं. यासह तो आयपीएल स्पर्धेत अर्धशतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने गोलंदाजांची धुलाई सुरूच ठेवली. पुढे त्याने ३५ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. हे या हंगामातील वेगवान शतक ठरलं. यासह तो या स्पर्धेत सर्वात वेगवान शतक झळकावणारा भारतीय फलंदाज ठरला. या स्पर्धेत सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा रेकॉर्डही वैभवने आपल्या नावावर केला आहे.
वैभवने शतक पूर्ण करून राजस्थानला एकहाती विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर रोहित शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने वैभवचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर कॅप्शन म्हणून त्याने , “ क्लास..” असं लिहिलं आहे. रोहित शर्मासह अनेक दिग्गज खेळाडूंनी देखील वैभवच्या खेळीचं कौतुक केलं आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड डगआऊटमध्ये जल्लोष करताना दिसून आले.