Rohit Sharma Lowest Strike Rate In IPL 2023: आयपीएल २०२३ चा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंळुरु आणि मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात आरसीबीने मुंबईवर ८ गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. त्याचबरोबर या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. तो आयपीएलचा पहिला कर्णधार आहे, ज्याचा स्ट्राईक रेट सर्वात खराब राहिला.
या सामन्यात रोहित शर्माच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बंगळुरूने विजयासाठी दिलेले १७२ धावांचे लक्ष्य दोन गडी गमावून पूर्ण केले. या विजयात आरसीबी संघासाठी माजी कर्णधार विराट कोहलीने मोलाचे योगदान दिले. विराट कोहलीने ४९ चेंडूचा सामना करताना नाबाद ८२ धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीत ६ चौाकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.
सर्वात खराब स्ट्राइक रेटची रोहित शर्माने केली नोंद –
डावाची सलामी देण्यासाठी आलेला रोहित शर्मा धावा करण्यसाठी झगडताना दिसला. त्याला आरसीबीच्या गोलंदाजांविरुद्ध खूप संघर्ष करावा लागला. दरम्यान, तो १० चेंडूत १ धाव काढून बाद झाला आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १०चा होता. १० चेंडू खेळल्यानंतर आयपीएलमधील कोणत्याही संघाच्या कर्णधाराचा हा सर्वात खराब स्ट्राइक रेट आहे. एवढेच नाही तर २०२२ मध्येही रोहित शर्माने दोन सामन्यांमध्ये अशीच कामगिरी केली होती. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याचा स्ट्राइक रेट १५.३८ राहिला होता. तसेच कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्याचा स्ट्राइक रेट २५ होता.
मुंबई इंडियन्सची मागील वर्षापासूनची कामगिरी –
आयपीएल २०२२ मध्येही मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने झाली होती. गेल्या वर्षी ब्रेबॉर्न येथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने त्याचा ४ गडी राखून पराभव केला होता. त्याचवेळी, आयपीएल २०२३ मध्येही मुंबईने पराभवाची सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या संघाची कामगिरी गेल्या मोसमातील सर्वात खराब होती. आयपीएल २०२२ मध्ये पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्स शेवटच्या म्हणजे १०व्या क्रमांकावर होती. गेल्या वर्षी रोहितच्या संघाला १४ पैकी केवळ ४ सामने जिंकता आले होते.